दुष्काळात जन्मलो, पण दुष्काळात मरू देणार नाही; आमदार समाधान आवताडे यांचा शब्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2022 09:20 AM2022-08-28T09:20:18+5:302022-08-28T09:20:43+5:30
मंगळवेढ्याच्या माथीचा दुष्काळी तालुक्याचा कलंक पुसला जाणार
मंगळवेढा : मल्लिकार्जुन देशमुखे
तालुक्यातील २४ गावच्या उपसा सिंचन योजनेला ५७८ कोटी रुपयांची गरज असून, निधी उपलब्ध करून योजना मार्गी लावण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात निवडून आल्यावर मला जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद अधिवेशनात मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या मंजुरी मिळाल्यावर मला झाला. लवकरच निधी मिळवू. या तालुक्यातील दुष्काळात जन्मलेल्या माझ्या जनतेला दुष्काळात मरू देणार नाही, अशी ग्वाही आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
मंगळवेढ्यात मारुतीच्या पटांगणात सायंकाळी २४ गावच्या जनतेच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना दिली.
यावेळी माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी सभापती विष्णुपंत आवताडे, अँड. बापू मेटकरी, बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे,युवराज शिंदे, राजेंद्र सुरवसे, धनाजी गडदे, अशोक केदार, शशिकांत चव्हाण, सुधाकर मासाळ, बाळासाहेब रेड्डी, सुरेश भाकरे, धनंजय पाटील, चंद्रकांत पडवळे, कैलास कोळी दत्तात्रय नवत्रे, उपस्थित होते.
शशिकांत चव्हाण म्हणाले, दुष्काळी तालुका अशी ओळख आता पुसणार असून, उजनी व म्हैसाळ योजनेत शेवटी असल्याने तालुक्याला सातत्याने करावा लागला. अॅड. बापूसाहेब मेटकरी म्हणाले, यापूर्वी मतासाठी पाण्याचे राजकारण केले. मात्र हा क्षण सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा. या वेळी धनंजय पवार, शिवाजी पटाप, सुरेश जोशी, कुमार पाटील, विवेक खिलारे, राजू मेतकुटे, दत्ता सावणे , दत्ता नवत्रे उपस्थित होते. अशोक केदार यांनी प्रास्ताविक केले. दिगंबर यादव यांनी सूत्रसंचालन केले.
................................................
२४ गावचे शेतकरी रॅलीत सहभागी--
मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांचा पाणीप्रश्न अधिवेशनात मांडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधिवेशनानंतर सात दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजुरी घेऊन त्यानंतर सात दिवसात कॅबिनेट लावून विशेष बाब म्हणून मंजूर करून घेऊ, असा शब्द घेतल्याने अधिवेशन संपवून शनिवारी आमदार समाधान आवताडे हे मतदारसंघात आले. तेव्हा २४ गावांतील शेतकरी व कार्यकत्यांनी मोटारसायकल रॅली काढून त्यांचे स्वागत केले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी सभापती सुरेश ढोणे, सचिन शिवशरण, उद्योजक लक्ष्मण मस्के रॅलीत सहभागी झाले होते.'
................................................
या प्रलंबित प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरू...
बसवेश्वर स्मारक, संत चोखामेळा स्मारक, पौट साठवण तलाव, भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, गुंजेगाव पुलाचा प्रश्न, एमआयडीसीचा प्रश्न, ग्रामीण रुग्णालय, रस्त्यांचे प्रश्न, असे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे, असे आमदार आवताडे यांनी सांगितले.
................................................
यांचेही योगदान विसरता येणार नाही...
मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या माजी आमदारांसह (स्व.) आमदार भारत भालके, जयसिंग निकम, बाबासाहेब बेलदार यांच्या प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले. त्यांचे योगदानही विसरता येणार नाही, असेही आमदार आवताडे म्हणाले.