दोन्ही घरात उजेड...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 03:25 PM2018-11-10T15:25:34+5:302018-11-10T15:25:56+5:30
चकाचक मॉलमधून आपण वीस-पंचवीस हजारांचा माल घेऊन बाहेर पडतो. आपल्या गाडीची डिकी भरते. आनंदानं मन काही भरत नाही. आपली ...
चकाचक मॉलमधून आपण वीस-पंचवीस हजारांचा माल घेऊन बाहेर पडतो. आपल्या गाडीची डिकी भरते. आनंदानं मन काही भरत नाही. आपली दिवाळी होते. पण आनंद हा काही आपल्या एकट्या मनाचा आविष्कार नाही. तो आपल्या सोबतच्या जगाला वाटतं त्यात आनंदाचे रंग भरत जगण्याचा प्रकार आहे. आपल्या मनातला आनंद कुणाला तरी कळावा आणि तो कळला तर त्या आनंदाची पावती आपल्याला मिळते. मॉलच्या दारात भली मोठी हातभर पावती काढून गोड हसत काउंटरवरून एक स्माईल मिळते. त्या स्माईलसाठी तिला पगारही मिळतो. आपल्याला वाटतं आपल्यासारखं या जगात कुणीच सुखी नाही. घेतलेलं सगळं घरात आणून टाकतो आणि आपल्या आनंदाच्या मर्यादा संपतात.
सहजीवनाच्या जगण्यात हा आनंद विरघळून जात नाही. तो अधिक गडद होत जातो. तो कसा? दिवाळी ही जशी आपल्या आनंदाची गोष्ट आहे. तशी ती इतरांच्या जगण्यात आनंद निर्माण करण्याची गोष्ट आहे. बाजारातून पॅकिंग माल आपण आहे अशा किमतीत विकत आणतो. पण आपली अभिरुची इतकी संपन्न आणि समृद्ध झालेली असते की पॅकिंग म्हणजे सर्वाेत्कृष्ट. अशावेळी रस्त्यावर विक्री करत बसलेल्या छोट्या विके्रत्यांकडे आपण ढुंकूनही पाहत नाही.
जेव्हा रस्त्यावर दिवाळीच्या पणत्या विकण्यासाठी अनेक छोटे गरीब विके्रते बसलेले असतात. त्यांच्याकडून आपणास पणत्या विकत घेण्याऐवजी आपल्याला चायनीज पणत्या घेण्याचा मोह होतो. अशातून काय होतं? आपला सण तर भारतीय मातीतला असतो. पण आपल्या घरात जे दिवे उजळलेले असतात. ते चायनीज मातीत उजळलेले असतात. दोन रुपयाला एक पणती घ्या म्हणून ओरडणारे इवले इवले हात जेव्हा मी पाहतो, तेव्हा वाटतं; यांच्याकडून आपण दोन-तीनशे पणत्या तरी विकत घेऊन जावं. पण असे दिवे लावायला वेळ कुठं आहे? अशा अवस्थेत आपण पॅकिंगमधल्या मेणाच्या डझनभर आणलेल्या पणत्यांच्या उजेडात दिवाळी साजरी करतो. पण मातीच्या पणत्या विकणाºया त्या चिमुकल्यांचे डोळे किलकिलताना पुन्हा पुन्हा जेव्हा नजरेसमोरून जात नाहीत, तेव्हा मी विचार करतो.
रस्त्यावरील रांगोळी, फुलं किंवा पणत्या विकणाºयांकडून आपण थोडंफार काही विकत घेतलं, तर त्यांच्या आयुष्यात आनंदाचं प्रमाण किती वाढणार? समजा पन्नास पणत्या विकत घेतल्या. तर पन्नास पणत्यांचे दोन रुपयांनी शंभर रुपये होतात. या शंभर रुपयांमध्ये त्याचे कष्ट, त्याचा पगार, त्याचा फायदा किती असणार? पण त्या शंभर रुपयांमधून किमान त्याला वीस-तीस रुपये शिल्लक राहिले, तर तर त्याच्या आनंदाला मर्यादा राहत नाही. मला हसू येतं. एवढ्या पैशात त्याचं जगणं कसं काय उभं राहणार? तरी म्हणायला काही हरकत नाही. की त्यातून त्याचं जगणं उभं राहतं. नाहीतर असे वीस-तीस रुपयेही शिल्लक राहिले नसते तर तो कोलमडून पडला असता. प्रश्न आहे तो आपण ते विकत घेतो की नाही त्याचा.
मुख्य मार्केटच्या दारात अशा छोट्या विके्रत्यांची असंख्य दुकाने गर्दी करून दाटीने उभी असतात. आपल्याला मात्र आता मोबाईलवरून खरेदी केलेल्या आणि पाठीवरती सॅक घेऊन दारात उभ्या असलेल्या एखाद्या कंपनीच्या आॅर्डर डिलिव्हरीवाल्याकडे डोळे लागलेले असतात. आपलं घेणं होतं. आपल्या आनंदाला उधाणही येतं. पण यातून कुणाच्या पोटाचे प्रश्न मिटणार आहेत याचं गणित मात्र कळत नाही. आपला सभोवताली आपल्या गरजांमुळं थोडाफार आनंदीत होणार असेल तर आपण आपल्या दृष्टीला पुसून घ्यायला काय हरकत आहे.
या दिवाळीत बाजारात फिरून आल्यावर रस्त्याच्या कडेला बसलेल्या त्या चिमुकलीचे हात डोळ्यांसमोर वारंवार दिसत होते. ती पणत्या विकत होती. ऊन लागत होतं. तशीच उन्हात बसलेली. पण ती आपल्या पणत्या विकण्यासाठी बसली होती. तिच्याकडे त्यांच्या जाहिरातीसाठी कुठलंच माध्यम नव्हतं किंवा त्या मातीच्या पणत्यांचा बँडही नव्हता. अशावेळी ती स्वत:च्या कौशल्यानं हात उंचावून येणाºया-जाणाºयांकडं विनवणी करीत होती. मी विचार केला. आपण आपली दिवाळी साजरी करत असताना, त्या चिमुकलीच्या डोळ्यातले लुकलुकते दिवे समजून घेणार आहोत की नाही? तिचे ते विनवणीचे हात बघणार आहोत की नाही? माणसाच्या उमेदीचा उत्साह संपण्याआधी तिच्या हातातल्या चार-दोन पणत्या घेतल्या तर, तिच्याही घरात उजेड आणि आपल्याही घरात उजेड. ‘खुशी के भेस में’ असं राहण्यापेक्षा, ‘खुशी के देश में’ असं राहायलं हवं ना?
- इंद्रजित घुले
(लेखक हे कवी, साहित्यिक आहेत.)