सैराटमधील विहिरीनं गाठला तळ, वाळलेल्या झाडाचीही तुटली फांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:31 PM2019-01-11T12:31:41+5:302019-01-11T12:34:09+5:30
यंदाच्या सरलेल्या मान्सूनमध्ये करमाळा तालुक्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळाने तालुक्यात रौद्ररूप धारण करावयास सुरुवात केली आहे.
नासीर कबीर
करमाळा : सैराट सिनेमात अख्ख्या महाराष्ट्रातील सिनेरसिकांनी पाहिलेली करमाळा तालुक्यातील देवळाली गावशिवारातील विहिरीने दुष्काळाच्या भीषण टंचाईत तळ गाठलेला आहे. सैराट चित्रपटातीलच श्रीदेवीचामाळ येथील वाळलेल्या झाडाची एक फांदी तुटली आहे. झाड केव्हा कोसळेल याचा नेम राहिलेला नाही.
मराठी चित्रपटसृष्टीत सिनेरसिकांनी डोक्यावर घेतलेला व कोटीचे उड्डाणे पार करणाºया सैराट चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक नागराज मंजुळे करमाळ्यातील जेऊर गावचे रहिवासी आहेत. त्यांचे संपूर्ण बालपण करमाळा शहरात, तर वास्तव्य जेऊर येथे असल्याने पिस्तूल्या लघुपटानंतर गाजलेला फॅन्ड्री सिनेमा काढल्यानंतर नागराजने करमाळा तालुक्याच्या मातीत सैराट चित्रपटाचे केम, कंदर, वांगी, कुगाव, करमाळा, देवळाली, श्रीदेवीचामाळ, मौलालीमाळ या ठिकाणी शूटिंग केले. सैराटने लोकप्रियता मिळवली. मराठी सिनेजगतात ऐतिहासिक कोटीचा टप्पा पार केला. सैराट प्रदर्शित होऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे.
सैराट सिनेमाबरोबर करमाळा तालुक्याचा परिचय राज्यात व देशात झाला. सैराट चित्रपटात असलेला करमाळा तालुक्यातील कंदर येथील शंकरराव भांगे यांचा बंगला, श्रीदेवीचामाळ येथील महाकाय विहीर, वाळलेले झाड, करमाळा बसस्थानक, किल्ला, कुगाव येथील उजनी धरणातील इनामदार यांचा पडलेला वाडा, देवळाली येथील धर्मराज राखंडे यांची विहीर, जेऊर येथील नागराज मंजुळेंचे पत्र्याचे घर या सिनेमात चित्रित केलेली ठिकाणे पाहण्यासाठी आजही राज्यभरातून सिनेरसिक येतात व सेल्फी काढून जातात.
यंदाच्या सरलेल्या मान्सूनमध्ये करमाळा तालुक्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळाने तालुक्यात रौद्ररूप धारण करावयास सुरुवात केली आहे. सैराट सिनेमात नागराज मंजुळे यांनी देवळाली येथील भास्कर राखुंडे यांच्या पुरातन पाण्याने भरलेल्या विहिरीचे चित्रीकरण केले होते. या विहिरीत परशा, आर्ची, लंगड्या व मंग्या उड्या मारून पोहत असलेल्या विहिरीने सध्या तळ गाठलेला आहे. राखुंडे वस्तीवर सर्वांची तहान भागवणाºया या विहिरीचे पाणी तळाला जाऊन पोहोचले आहे, तर सैराट चित्रपटातील श्रीदेवीचामाळ येथील वाळलेले झाड नामशेष होऊ लागले आहे.
सैराट सिनेमात त्या वाळलेल्या झाडावर एका फांदीवर आर्ची व दुसºया फांदीवर परशा बसून संवाद करतात. ते वाळलेले झाड राज्यातील लाखो प्रेक्षकांनी येथे येऊन पाहिलेले असून आर्ची-परशा ज्याप्रमाणे वाळलेल्या झाडावर बसले. त्याप्रमाणेच या वाळलेल्या झाडावर चढून बसण्याचा मोह लाखो युवक-युवतींना आवरलेला नाही. यामुळे त्या वाळलेल्या झाडाची सैराटमधील आर्ची ज्या फांदीवर बसून संवाद करते, ती फांदीच आता तुटलेली असून, संपूर्ण झाडच धोकादायक बनले असून, ते कधी पडेल याचा नेम राहिलेला नाही.