महाळुंग-श्रीपूरच्या विकासासाठी निवडणुकीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:16 AM2021-01-01T04:16:38+5:302021-01-01T04:16:38+5:30
श्रीपूर : गावाच्या विकासासाठी महाळुंग- श्रीपूरच्या सर्वपक्षीय नेते मंडळीने एकमताने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा ...
श्रीपूर : गावाच्या विकासासाठी महाळुंग- श्रीपूरच्या सर्वपक्षीय नेते मंडळीने एकमताने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस असताना या गावातून कोणताही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे बहिष्कार यशस्वी झाला असून, आता राज्य सरकारकडे गाव नगरपंचायत व्हावी यासाठी जोर लागणार आहे.
महाळुंग-श्रीपूर या ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणार आहे. नगरपंचायतमार्फत गावाचा मोठा विकास होणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. गावाची निवडणूक प्रक्रिया होणार नसून काही महिने प्रशासक गावाचा कारभार हाकणार आहे.
माळशिरस तालुक्यात महाळुंग-श्रीपूर ही ग्रामपंचायत विस्ताराने मोठी आहे. त्यामध्ये महाळुंग, श्रीपूर, गट नंबर २ अशा तीन विभागांमध्ये गाव विस्तारले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास २५ हजारापर्यंत आहे. मतदारांची संख्या २५ हजारांपर्यंत आहे. एकूण सहा प्रभाग असून, १७ सदस्य संख्या आहे. महाळुंग-श्रीपूर ही नगरपंचायत होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राज्य शासनानेसुद्धा या गावाची ग्रामपंचायत निवडणूक रद्द करावी, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती. पण कोणताही निर्णय न झाल्याने निवडणूक लागली.
दरम्यान, पॅनल प्रमुख आणि ग्रामस्थ यांनी बैठक घेऊन ग्रामपंचायतीसाठी कोणीच अर्ज दाखल न करण्याची विनंती केली. बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.