वाड्या वस्त्यांवरची पोरं आता आपत्ती यंत्रणेत काम करणार; माणसं, पशुपक्ष्यांसोबत प्राण्यांचा जीव वाचविणार
By Appasaheb.patil | Published: May 23, 2023 02:53 PM2023-05-23T14:53:59+5:302023-05-23T14:54:08+5:30
या उपक्रमामुळे वाड्या, वस्त्या, गावातील तरूण मुलं आपत्तीच्या काळात मदतीसाठी धावतील अन् हजारो लोकांचा जीव वाचविण्याचे पुण्य काम करतील.
सोलापूर : संभाव्य आपत्ती रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेस आपत्ती साक्षर कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक वाडी, गाव व शहरातील नागरिक,स्वयंसेवक यांना मागेल त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अशा प्रकारचा उपक्रम हा राज्यात एकमेव असेल की जो आपत्ती प्रतिसाद साक्षर होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी असणार आहे.
या उपक्रमामुळे वाड्या, वस्त्या, गावातील तरूण मुलं आपत्तीच्या काळात मदतीसाठी धावतील अन् हजारो लोकांचा जीव वाचविण्याचे पुण्य काम करतील. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. या पावसाळ्यात आपत्तीच्या अनुषंगाने मोठया प्रमाणात घटना घडतात. नदीला पूर येणे, ओढे, नाल्यावरून पाणी वाहने, दरडी कोसळणे, रस्ता खचणे, पावसाच्या पाण्यामुळे घरांचे नुकसान होणे आदी आपत्तीच्या घटना घडतात, या आपत्तीच्या काळात आता तरूणांना काम करायची संधी शासनाने मिळवून दिली आहे. त्यासाठी मागेल त्याला आपत्ती साक्षर कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
असा करा अर्ज..
सोलापूर जिल्ह्याच्या https://solapur.gov.in/en/disaster-management संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. ऑनलाईन नोंदणीधारकांना "आपत्ती साक्षरता" चे एकदिवसीय प्रशिक्षण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत देण्यात येईल. प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षित स्वयंसेवकास ओळखपत्र देण्यात येईल. सदर प्रशिक्षणार्थीचा डेटा हा जिल्ह्याच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
प्रशिक्षण संपल्यानंतर पुढे काय ?
सोलापूर जिल्ह्यामध्ये आपत्ती जनक घटना घडल्यानंतर योग्य मदत मिळण्यासाठी - आपत्ती साक्षर प्रशिक्षित स्वयंसेवकांना पाचारण केले जाऊ शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सर्व स्वयंसेवक,नागरिकांना आवाहन करणेत येते की, पंढरपूर आषाढीवारीमध्ये आपत्तीजनक परिस्थितीचा मुकाबला,सामना करणेकामी गालखी मार्गावरील सर्व स्वयंसेवक,नागरिक यांनी आपत्ती साक्षर चे प्रशिक्षण घेणेकामी ऑनलाईन नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.