पोटच्या मुलाने झोपेतच आईचा केला खून, सांगोला तालुक्यातील पाचेगांव बु येथील घटना
By admin | Published: April 3, 2017 08:50 PM2017-04-03T20:50:36+5:302017-04-03T20:50:36+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सांगोला दि़ २ : शेतातील काम करण्याबाबत आई सांगत होती व तो करीत नव्हता यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडून भांडण होत होती. याचाच राग मनात धरुन पोटच्या मुलाने झोपेतच लोखंडी गजाने आईच्या डोक्यात व कपाळावर जबर फटका मारुन तीला जागेवरच जीवे ठार मारले. ही दुदैर्वी घटना सोमवारी पहाटे 4.15 च्या सुमारास पाचेगांव बु।।(कानबुडे वस्ती)ता.सांगोला येथे घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
वैजयंता लक्ष्मण कानबुडे-५०, असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून अक्षय लक्ष्मण कानबुडे-२२ असे स्वत:च्या आईचा खुन करणाऱ्या मुलाचे नाव आहे. स्वत:च्या आईला जीवे ठार मारुन अक्षयने घरातून पलायन केले होते परंतू पोलीसांनी अवघ्या काही तासातच अक्षयला ताब्यात घेऊन खुनाचा छडा लावल्याने नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.
पाचेगांव बु।।(कानबुडे वस्ती)ता.सांगोला येथील वैजयंता लक्ष्मण कानबुडे-५०, या महिलेच्या पतीने १२ वषार्पूर्वी निधन झाल्याने २२ वर्षीय मुलगा अक्षय समवेत ती राहत होती. वैजयंतास स्वत:ची 5 एकर बागायत शेतजमीन असून जनावरे असा ती प्रपंच करीत होती. तीच्या दोन्ही मुलींची लग्ने झाल्याने सासरी नांदत आहेत तर अक्षयचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. आईने त्यास शेतातील कोणतीही कामे सांगितली तर तो ऐकत नसे. उलट दिवसभर टी.व्ही.पाहणे व टाईमपास करणे एवढेच तो काम करीत होता यामुळे त्याचे व आईचे वारंवार खटके व भांडणे होत होती. दरम्यान गेल्या पाच-सहा दिवसापूर्वी तो आरेवाडी(ता.क.महांकाळ)येथील बिरुबा देवाची यात्रा असल्याने देवाची सेवा करण्याकरिता गेला होता. अक्षय तेथून रविवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास घरी आला होता. रात्री दोघेही घरात झोपी गेले. पहाटेच्या सुमारास अक्षयने आई झोपेत असल्याचे पाहून लोखंडी गजाने तीच्या डोक्यात व कपाळावर जबर वार करून तीला ठार केले व घरातून पळून गेला होता दरम्यान सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मयत वैजयंताच्या बहिणीचा मुलगा त्यांच्याकडे आला असता त्याला मावशी घरातील बेडवर रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत दिसून आली. यावेळी त्याने आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेतले. मात्र अक्षय यावेळी घरात नव्हता. त्याने पुढील दरवाजाला बाहेरून कडी लावून मागच्या दरवाजाने तो पसार झाला होता. या घटनेची खबर सांगोला पोलीसांना मिळताच पो.नि.हारुण शेख, सपोनि बाबासाहेब बिराजदार सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी, पो.नि.हारुण शेख यांनी क्षणाचाही विलंब न लावता अक्षयचा शोध घेतला असता तो आरेवाडीच्या यात्रेतून पोलीसांनी ताब्यात घेतला. पो.नि.हारुण शेख यांनी अक्षयकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रुपाली राजाराम दुधाळ रा.सांगली हीने पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.हारुण शेख, सपोनि बाबासाहेब बिराजदार, पोलीस हवालदार आबा मुंडे, कैलास मारकड, लतीफ मुजावर, पो.कॉ.सुनील बनसोडे, पो.ना.जाधवर, अविनाश डिगोळे, महिला पोलीस सुरवसे, चौगुले, यांनी ही कामगिरी केली आहे. पोलीस पाटील पोरे यांनी या गुन्ह्याच्या तपासकामात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.