ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटणाऱ्या बहाद्दूर हौसाक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:16+5:302021-09-26T04:24:16+5:30

हौसाक्का पाटील चार वर्षांच्या असताना त्यांच्या मातेचं निधन झालं. क्रांतिसिंहांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हाच खरा आपल्या ...

Brave Hausakka who looted British arms! | ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटणाऱ्या बहाद्दूर हौसाक्का!

ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटणाऱ्या बहाद्दूर हौसाक्का!

googlenewsNext

हौसाक्का पाटील चार वर्षांच्या असताना त्यांच्या मातेचं निधन झालं. क्रांतिसिंहांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हाच खरा आपल्या वंशाचा दिवा आहे, असे म्हणून त्यांना सांभाळलं. चिमुकल्या वयामध्ये हौसाक्का हातात तिरंगा घेऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध रस्त्यावरती आल्या. त्यांच्या जडणघडणीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांना वेळ मिळाला नाही.

हौसाक्का यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं आणि ब्रिटिशांचं जुलमी राज्य नष्ट व्हावं, यासाठी निर्भीडपणे लढा उभारला. सुरलीच्या घाटात ब्रिटिशांच्या गाडीवर छापा टाकला. वांगी इथला ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. भवानीनगर रेल्वे स्थानकावर इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी वेषांतर करून योजना आखली आणि ती त्यांनी यशस्वी करून दाखविली. गोवा स्वतंत्र व्हावा यासाठी त्या मांडवी नदी पार करून पणजीत पोहोचल्या. छत्रपती संभाजीराजे यांच्यानंतर मांडवी नदी पार करण्याचे सामर्थ्य हौसाक्का पाटील यांच्यामध्येच होते.

पुरुषांप्रमाणे स्त्रियादेखील हिंमतवान, निर्भीड, लढवय्या आणि महाबुद्धिमान असतात हे हौसाक्कांनी दाखवून दिलं. त्यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतरही त्या शांत बसल्या नाहीत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये त्यांनी उडी घेतली. कष्टकरी, कामकरी, शेतकरी यांना न्याय मिळावा, यासाठी सतत शासन व्यवस्थेविरुद्ध लढत राहिल्या. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्या सतत संघर्ष करत राहिल्या.

तत्कालीन फडणवीस सरकारने पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिल्यानंतर हौसाक्का चवताळून उठल्या. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्यांनी जाहीर सभेत या पुरस्काराला विरोध केला. सांगलीत शिवसन्मान जागर परिषदेमध्ये काहीजणांनी जितेंद्र आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला, त्यावेळेस त्याच कार्यक्रमात हातात काठी घेऊन त्या उभ्या राहिल्या.

हौसाक्का पाटील यांची हिंमत, निर्भीडपणा, स्वाभिमान, बाणेदारपणा, तळमळ, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील. त्या केवळ क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या आणि भाई भगवानराव मोरे पाटील यांच्या पत्नी एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही तर, त्या देखील स्वतः शूर, निर्भीड आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या.

हौसाक्कांना अनेक वेळा तुरुंगवास झाला. इंग्रजांनी त्यांच्या घरावरती अनेकवेळा छापा टाकला. बालपणापासून त्यांना संघर्षाला सामोरे जावे लागले. स्वातंत्र्यानंतरही अनेक आंदोलनांमध्ये त्यांना तुरुंगवास झाला. पण, त्या डगमगल्या नाहीत. संकटसमयी त्या लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या.

त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभले. त्यांच्या मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपलं. त्यामुळे त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभलं. हौसाक्का पाटील या स्वातंत्र्यासाठी लढल्या. आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरती त्या अनंतात विलीन झाल्या. इतिहास पाहिलेल्या, इतिहास घडवलेल्या आणि वर्तमानाला प्रेरणा देणाऱ्या त्या ऐतिहासिक महामानव आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता आपल्या सर्वांना व्यथित करणारी आहे.

आम्ही हौसाक्का पाटील यांना अनेकवेळा भेटायला जायचो. त्यामुळे त्यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यांना पाहिल्यानंतर प्रेरणा मिळत असे. त्या इतिहासातील महामानव आहेत तर, वर्तमानातील दीपस्तंभ आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

- डॉ. श्रीमंत कोकाटे (लेखक इतिहास संशोधक आहेत.)

-----

Web Title: Brave Hausakka who looted British arms!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.