भाजलेल्या, उकडलेल्या शेंगा अन् पुदिना चटणी.. खमंगपणा देणाºया ‘स्ट्रीट मेन्यु’ची सोलापुरात वाढतेय मागणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:06 PM2019-07-05T12:06:22+5:302019-07-05T12:10:27+5:30
दररोज लाखोंची उलाढाल : घुंगरू शेंगांना जास्त मागणी
रूपेश हेळवे
सोलापूर : सोलापूरकर हे नेहमीच शेंगाप्रेमी शेंगा चटणी असो की शेंगा पोळी शेंगा भाजी असो की शेंगा लाडू ... सोलापूरकरांना शेंगाचे सारेच पदार्थ आवडतात़ आतातर पावसाळी वातावरणात भिजल्या पावसात वाफाळलेल्या शेंगा व पुदीना चटणी खाण्यासाठी सोलापूरकरांच्या उड्याच पडतायत़ या ओल्या शेंगामध्येही दोन प्रकार बरं का़.. एक भाजलेल्या तर दुसºया उकडलेल्या़
सोलापूरकरांना शेंगा आवडतात़ हे कोणाला सांगायची गरज नाही.
मराठवाडा, उस्मानाबाद, दक्षिण सोलापूर आदी भागात शेंगाच्या उत्पादनासाठी उपयुक्त अशी जमीन आहे़ यामुळे या भागात शेंगाचे पीक हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते़ यामुळे सोलापुरात शेंगा कमी दरातच उपलब्ध असतात़ शेंगाचे दर कमी असो वा जास्त असो सोलापुरात मागणी मात्र कधीच कमी होताना दिसत नाही़ यामुळे अनेक शेतकरी प्रत्येक वर्षी न चुकता शेंगाचे पीक घेतात़ याच शेंगामुळे लाखोंची उलाढालही सोलापूर बाजार समितीमध्ये दररोज होत असते़
भाजलेल्या शेंगा, उकडलेल्या शेंगा या विकताना पाहिले की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही़ शेंगा या पावसाळ्यात भिजत खाण्याची मजा काही औरच असते़ शेंगा या फक्त चवच देत नाही तर यामुळे शरीराला आवश्यक असलेले प्रोटीनही यामधून मिळतात़ शेंगामुळे वजन वाढण्यासही मदत होते़ पावसाळा सुरू झाला की कणिस, कच्च्या शेंगा बाजारात येतात़ बाजारातही यांना चांगली मागणी असते़ भाजक्या उकडलेल्या शेंगा खाल्ल्यामुळे फक्त जिभेचीच चव भागत नाही तर शेंगा या शरीरालाही पोषक असतात़ यामुळेच डॉक्टरही शेंगा खाण्याचा सल्ला देत असतात़ शेंगदाण्यामध्ये ओमेगा-६ फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळते. चांगल्या त्वचेसाठीही फायदेशीर असते़ त्वचेसाठी उत्तम मानले जाते.
सध्या उकडलेल्या शेंगांना जास्त मागणी आहे. भाजक्या शेंगापेक्षा उकडलेल्या शेंगा या जास्त आवडीने खाल्ल्या जातात. घुंगरू, डबल, आणि जबलपुरी अशा प्रकारच्याही शेंगा असतात. पण यापैकी घुंगरू शेंगा म्हणजेच जवारी शेंगांना जास्त मागणी असते़ यामुळे या शेंगा जास्त आवडीने खाल्ल्या जातात. शेंगदाण्यामध्ये काजूप्रमाणे विविध आरोग्यासाठी चांगले असणारे काही गुण आढळून येतात. शेंगदाण्यामध्ये तेल असल्यामुळे हे पोटाचे आजार नष्ट करतात. याच्या नियमित सेवनाने पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्या दूर होते़
शेंगदाण्यामधील गुण
- शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीआॅक्सिडेंट भरपूर प्रमाणात असते. शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात.
आमच्याकडे खारीमुरी शेंगा, साधी टरफल खारी शेंगा, बेसन शेंगा, मसाला शेंगा तयार केल्या जातात़ सध्या पावसाळ्यामध्ये सर्वच प्रकारच्या शेंगांना जास्त मागणी आहे़ दिवसाकाठी प्रत्येक प्रकारच्या शेंगा या ५० किलोपर्यंत विकल्या जातात़
- सुनील सिद्धे, शेंगा व्यापारी
भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि फॅट जास्त असते़ ज्यांना वजन वाढवायचे आहे, अशांनी शेंगदाणे खावे़ भाजलेले शेंगदाणे हे सालीसह खावे हे शरीराला चांगले असते़ सालीमुळे शरीराला आवश्यक असे आॅईल मिळते़ उकडून शेंगा खात असाल तर अतिशय चांगले आहे़ पण यामध्ये मीठ टाकू नये. मीठ टाकल्यामुळे सोडियम वाढते. ब्लडप्रेशर वाढू शकतो़ उपवासात शेंगाचा वापर जास्त होतो, त्यावेळी पित्ताचा त्रास होतो़ यामुळे शेंगा जास्तही शरीरास चांगल्या नसतात. लहान मुलांना दिवसातून मूठभर शेंगा खायला देण्यास हरकत नाही.
- डॉ़ अश्विनी अंधारे, आहारतज्ज्ञ
शेंगाचा भाव सध्या ५० ते ६० रुपये किलो आहे. पण गिºहाईक उकडलेल्या शेंगा आणि भाजलेल्या शेंगा या दहा आणि वीस रुपयांच्या घेतात, कच्च्या शेंगा मात्र किलोने घेतात.
- संगीता संजय शिंदे
शेंगा विक्रेत्या