Breaking; बार्शी-भूम महामार्ग शेतकऱ्यांनी अडविला; जाणून घ्या नेमकं कारण
By Appasaheb.patil | Published: September 22, 2022 01:17 PM2022-09-22T13:17:27+5:302022-09-22T13:17:34+5:30
अतिवृष्टी व पीकविम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळावी म्हणून शेतकरी आक्रमक
सोलापूर : अतिवृष्टी व पीकविम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळावी म्हणून गुरूवारी सकाळी पुन्हा अतिवृष्टीतून वगळलेले बार्शी तालुक्यातील शेतकरी, शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बार्शी- भूम मार्गावरील आगळगाव येथे रस्त्यावर उतरले.
सरकारविरोधी घोषणा देत सुमारे एक तास हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन बार्शीचे नायब तहसीलदार संजीवन मुंढे व आगळगाव मंडळ अधिकारी सारिका राऊत यांनी स्वीकारले. या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार राजेंद्र मंगरूळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला होता. यावेळी मुन्ना डमरे, सुनील माने, मुकेश डमरे, चुंबच्या सरपंच सुषमा जाधवर, कळंबवाडीच्या सरपंच प्रभावती मुंढे, भानसळेच्या सरपंच शकुंतला हिरे, मांडेगावचे सरपंच पंडित मिरगणे, भोयरेचे सरपंच दशरथ टेकाळे, काटेगावचे सरपंच चंद्रसेन गवळी, आगळगावच्या सरपंच पुतळाबाई गरड आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना गायकवाड म्हणाले की, वारंवार शांततेच्या मार्गाने निवेदने देऊन व आंदोलने करून सुद्धा शासन झोपलेलच आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये! अन्यथा ठरल्याप्रमाणे शेतकरी मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशाराही यावेळी गायकवाड यांनी दिला. पोपट डमरे, शरद उकिरडे, दिगंबर विधाते आदींची यावेळी भाषणे झाली.