दावं तोडून बिबट्यावर धाऊन जाणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:14+5:302021-06-04T04:18:14+5:30
म्हैस पिल्लाला नाही वाचवू शकली ! मोहोळ : दहा महिन्यांपूर्वी लोकांमध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याचे मोहोळ तालुक्यामध्ये पुन्हा आगमन झाले ...
म्हैस पिल्लाला नाही वाचवू शकली !
मोहोळ : दहा महिन्यांपूर्वी लोकांमध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याचे मोहोळ तालुक्यामध्ये पुन्हा आगमन झाले आहे. ३ जून रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास भोयरे येथील पवार वस्ती परिसरात गोरख बापू जाधव-थोरबोले यांच्या वस्तीवर हल्ला चढवला. डोळ्यादेखत होणारा हल्ला पाहून म्हशीनं दावं तोडून बिबट्याकडे धाव घेतली. त्याच्याशी १५- २० मिनिटे टक्कर देऊनही ती आपल्या पिल्लाला (रेडकू) वाचवू शकली नाही. दरम्यान, हा गोंधळ ऐकून जागे झालेले शेतकरी बाहेर येताच बिबट्याने धूम ठोकली. यामुळे तालुक्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गतवर्षी १६ ऑगस्ट २०२० रोजी मोहोळ येथील सीताराम गुरव यांच्या वस्तीवर पहिल्यांदा बिबट्या आढळून आला होता. त्यानंतर तीन महिने मोहोळ, घाटणे भोयरे, खरकटणे या परिसरामध्ये बिबट्याने दहशत माजवत अनेक जनावरांवर हल्ला केला होता. त्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरे लावले होते; परंतु बिबट्या सर्वांना चकवा देत गायब झाला होता. आता दहा महिन्यांनंतर ३ जून रोजी भोयरे येथील पवार वस्तीवरती हल्ला करीत एक रेडकू खाल्ल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत गोरख जाधव-थोरबोले यांच्या वस्तीनजीकच राहणारे आबासाहेब पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गुरुवारी पहाटे ३.३० च्या दरम्यान गोरख थोरबोले यांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला करीत एक रेडकू खाल्ले. रेडकावर हल्ला करताना जवळच बांधलेल्या म्हशीने दावे तोडून त्या बिबट्याबरोबर पंधरा ते वीस मिनिटे संघर्ष केला. हा सर्व गोंधळ ऐकून गोरख जाधव-थोरबोले घराबाहेर येताच आमच्या वस्तीजवळच आसलेल्या उसात बिबट्याने धूम ठोकली. वन खात्याने त्याच्या ठशाची पाहणी केली आहे. त्यामुळे आम्ही आता सावधगिरी बाळगत जनावरे घराजवळच बांधत आहोत.
----
वन विभागामार्फत पेट्रोलिंग
भोयरे येथील पवार वस्तीवर गोरख जाधव- थोरबोले यांच्या रेडकावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच वनरक्षक सचिन कांबळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तो हल्ला बिबट्यानेच केला आहे. त्याचे ठसे आढळून आले आहेत. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांना सावध केले केले असून, वन विभागामार्फत पेट्रोलिंग चालू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
----
मोहोळ परिसरात पुन्हा बिबट्या आढळून आला आहे. भोयरे येथे पवार वस्तीवर झालेल्या हल्ल्यानंतर वन विभागाच्या माध्यमातून परिसरात गस्त सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी शेतात वावरताना हातात काठी व सोबत बॅटरी घ्यावी. घराबाहेर वावरताना लहान मुलांची काळजी घ्यावी.
- जे. एन. पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी
----०३मोहोळ-बिबट्या