Breaking; पंढरपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; प्रदक्षिणा मार्ग होणार सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 10:48 AM2020-06-28T10:48:00+5:302020-06-28T10:48:21+5:30
पोलीस व आरोग्य विभाग सतर्क; आठजणांचा अहवाल बाकी
पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त पंढरीत येण्यासाठी भाविकांना बंदी केली आहे, तरीही प्रदक्षिणा मार्गावर रोज भाविक पंढरपुरात आढळून येत आहेत. यामुळे २९ जून ते २ जुलै असे यात्रेचे चार दिवस पंढरपूर शहर व शहरालगतचा ५ किमी परिसरात संचार बंदी लागू करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र आता प्रदक्षिणा मार्गावरच एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला आहे. यामुळे संचारबंदीचा निर्णय येण्यापुर्वीच अधिकचा उपाय म्हणून व इतर नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी प्रदक्षिणा मार्ग सिल करण्यात येणार आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे, गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी इतर जिल्ह्यातून आलेले व कोरोनाबाबची लक्षणे आढळून आलेल्या स्थानिक नागरीकांचे असे ४७ जणांचे आरोग्य विभागाकडून स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी ३९ जणांचा अहवाल आहे. ३६ जण निगेटिव्ह आहेत, तर त्यामध्ये २ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. तर आठ जणांचा अहवाले येणे बाकी आहे. त्याचबरोबर एकाचा स्वॅब व्यवस्थित घेतला गेला नव्हता.
या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात कितीजण आले याबाबतचा शोध घेण्याचे काम आरोग्य विभागा मार्फत सुरु आहे. त्याचबरोबर त्या आठ जणांच्या अहवाल पॉझिटिव्ह येतो की, निगेटिव्ह याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
---------------------------------------
प्रदक्षिणा मार्गावरील एकजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे शहरातील नागरीकांच्या आरोग्याचा दृष्टीने प्रदक्षिणा मार्ग कंन्टमेंट झोन करण्यात येणार आहे. या परिसरात इतर नागरीकांना जाऊ नये. त्या परिसरातील नागरीकांनीही घराबाहेर पडू नये.
- वैशाली वाघमारे
तहसिलदार, पंढरपूर