Breaking; महेश कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेश; शरद पवार म्हणाले, अगोदर फक्त भेटा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 11:47 AM2021-01-08T11:47:26+5:302021-01-08T11:48:09+5:30
ताफा मुंबईतच;
सोलापूर - शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी महेश कोठे कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन गुरुवारी दुपारी मुंबईकडे निघाले. यादरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी सकाळी प्रथम मला येऊन भेटा, असा निरोप पाठविला. हा निरोप ऐकून कोठे यांच्या प्रवेशासाठी धडपडत असलेले राष्ट्रवादीचे नेतेही बुचकाळ्यात पडले.
शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे महेश कोठे यांनी बुधवारी रात्री कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रवेशाची जाहीर चर्चाही हेाती. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शुक्रवारी सकाळी कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा कार्यक्रम होईल, असे कोठे गटाकडून सांगण्यात आले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून निरोप आल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह इतर नेतेही मुंबईला निघाले. कोठे यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पुण्यात पोहोचपर्यंत शरद पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या नेत्यांना निरोप आला. उद्या प्रथम महेश कोठे यांना २५ लोकांसोबत साहेबांना भेटायला सांगा. बाकीचा कार्यक्रम नंतर होईल. नंतर म्हणजे कधी होईल, असा प्रतिप्रश्न ज्येष्ठांकडून विचारण्यात आला. ते साहेबच सांगतील असे कार्यालयातून सांगण्यात आले. त्यामुळे कोठे गटाचे कार्यकर्तेही बुचकाळ्यात पडले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजता काय होईल याकडे लक्ष असणार आहे.
-----
हे राजकारण समोर ठेऊनच निर्णय
नियोजित कार्यक्रमानुसार महेश कोठे एकटेच राष्ट्रवादीत जाणार आहेत. कोठे गटाचे इतर नगरसेवक शिवसेनेत थांबणार आहेत. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी समोर ठेवूनच हा प्रवेश होत असल्याचे सांगण्यात येते. या प्रवेशावर कोठे यांचे पारंपरिक विरोधक आणि राष्ट्रवादीचे यापूर्वीचे शहर उत्तरचे उमेदवार मनोहर सपाटे, महेश गादेकर आदींनी जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
--------
विधानसभा निवडणुकीत माझी उमेदवारी डावलण्यात आली. उध्दव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. पण त्यांच्या जवळचे लोक आम्हाला चांगली वागणूक देत नाहीत. परवा सोलापुरात आल्यानंतर उध्दव ठाकरेंनी मला मुंबईत भेटायला बोलावले. पण जवळच्या लोकांनी वेळ दिली नाही. शरद पवार मला न्याय देतील असे वाटते. मी कुणावरही वैयक्तिक टीका करणार नाही.
- महेश कोठे, नगरसेवक.
साठे- कोठे यांच्यात होताच साटेलोटे; लगेच सुशीलकुमार शिंदेंना बरडे भेटे !
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे आणि महेश कोठे यांच्यात साटेलोट होताच शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी जुने डाव टाकले आहेत. बरडे यांनी गुरुवारी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे उपस्थित होते.