Breaking; सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम सत्रातील परीक्षा ऑफलाईनच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 04:48 PM2022-04-29T16:48:38+5:302022-04-29T16:48:42+5:30
सोलापूर विद्यापीठाची माहिती; वेळापत्रकात होऊ शकतो बदल
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा या मिश्र पद्धतीने (ऑनलाईन व ऑफलाईन) होणार आहेत. तर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याने अंतिम वर्षाच्या विद्यार्थी अभ्यासात गुंग झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
केंद्र व राज्य शासनाने कोरोना प्रादुर्भाव संदर्भात नियमावली ठरविल्या आहेत. त्यानुसार राज्यभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. या बैठकीत सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला आहे.
सर्व अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रांच्या परीक्षांसोबतच अपवादात्मक म्हणून एम. टेक. सत्र दोन, बी. आर्क सत्र आठ या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. सत्र क्रमांक १,३,५,७,९ (फ्रेश विद्यार्थी) या परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आले. पदवी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयात व विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक पहावयास मिळणार आहे.
----
विद्यापीठाच्या वेबसाईटवर माहिती
ऑनलाईन परीक्षा (एप्रिल/मे) देणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक पेपर हा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या पुढील सत्राच्या (नोव्हेंबर) सर्व परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना याचा सराव व्हावा यासाठी एक पेपर ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांनी संकेतस्थळावर खातरजमा करावी, असे सांगण्यात आले आहे.
परीक्षा मिश्र पद्धतीने घेण्याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घेण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग सध्या कमी झाला आहे. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार निर्माण होणाऱ्या परिस्थितीत शासनाने आदेश दिल्यास यात बदल होऊ शकतो. शेवटच्या वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
- डॉ. शिवकुमार गणपूर, परीक्षा व मूल्यमापन मंडळ