Breaking; उद्यापासून दिवसाला २ हजार भाविकांना मिळणार पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 02:22 PM2020-11-17T14:22:44+5:302020-11-17T18:16:20+5:30
ऑनलाइन बुकिंग ची मर्यादा वाढविली; विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत गर्दी
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करुन विठ्ठलाचे मुखदर्शन घडवण्याचे नियोजन मंदिर समितीने केले होते. कोरोना विषाणू या रोगाच्या प्रादुर्भावामुळे १ दिवसात १००० भविकांना दर्शन देण्याचे ठरले होते, परंतु या संख्येत १ हजाराने वाढ करण्यात आली आहे. यामुळे बुधवारपासून २ हजार भाविकांना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येईल अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
राज्य शासनाने १४ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना १६ नोव्हेंबर २०२० पासून दर्शनासाठी खुले करून देणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार श्री. विठ्ठल रूक्मिणी मातेचे फक्त मुखदर्शन देण्याच्या दृष्टीने भाविकांना ऑनलाईन दर्शन प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org/home.html या संकेतस्थळावरून भाविकांना ऑनलाईन बुकींग करणे अनिवार्य आहे. त्याप्रमाणे दैनंदिन जास्तीत जास्त १००० भाविकांना दर्शनाचा लाभ देण्याचे चालू करण्यात आले होते. परंतु भाविकांकडून होणारी मागणी विचारात घेऊन, सध्याच्या दैनंदिन १००० भाविकांच्या संख्येत वाढ करून १८ नोव्हेंबर २०२० पासून २००० करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यासाठी १० तासाचे स्लॉट (भाग) निश्तिच करण्यात आलेले आहेत. एका तासात आता २०० भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार असल्याचे विठ्ठल जोशी यांनी सांगितले.