सव्वातीनशे वर्षाची परंपरा खंडित; हुन्नूर येथील गुरु-शिष्य भेटीचा सोहळा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 08:58 AM2020-11-05T08:58:02+5:302020-11-05T08:58:56+5:30
कोरोनाचा परिणाम; महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भाविक नाराज
मंगळवेढा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हुन्नुर येथील बिरोबा-महालिंगराया गुरु-शिष्याच्या दि.६ नोव्हेबरच्या भेटीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. तब्बल सव्वा तीनशे वर्षाची परपंरा असलेला पालखी भेट सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती बिरोबा देवस्थान कमिटीचे सदस्य जगन्नाथ रेवे यांनी दिली.
हुन्नुर येथील बिरोबा हे हुलजंतीचे महालिंगरायाचे गुरु असून सतराव्या शतकापासून दरवर्षी अश्विन वद्य सप्तमीला हुलजंती येथून हजारो भाविक महालिंगराया ची पालखी घेऊन हुन्नुरमध्ये गुरु बिरोबाच्या भेटीसाठी धावत पळत येतात सायंकाळी चार वाजता बस स्थानकात शेजारी भेटीच्या मैदानावर मुक्तपणे भंडारा लोकरे खोबरे व ऊस आदीची उधळण करत लाखो भाविकांच्या साक्षीने हा भेटीचा नयनरम्य सोहळ्याची परपंरा अखंडितपणे सुरू आहे.
यंदा सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुक्रवारी होणारी भेट प्रशासनाने रद्द करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे व तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिल्याने सदरच्या भेटीचा सोहळा रद्द करण्यात आल्याने भाविकांनी या दिवशी हुन्नूरमध्ये नाहक गर्दी करु नये हे असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले.
-----------
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासन व देवस्थान कमिटीत चर्चा करून भेटीचा सोहळा खबरदारीचा उपाय म्हणून रद्द करण्याच्या सुचना दिल्या असून या दिवशी हुन्नूरात पोलिसाकडून चोख बंदोबस्त ठेवला जाणार असल्याने भाविकांनी विनाकारण हुन्नूर येथे गर्दी करू नये
-ज्योतीराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक