उष्माघातानं घायाळ घारीनं घेतला मोकळा श्वास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:05 PM2019-04-24T13:05:00+5:302019-04-24T13:09:36+5:30
प्राणीमित्रांची मदत; वीस दिवसांनंतर घारीची प्रकृती झाली ठणठणीत
सोलापूर: रंगभवनजवळील आयकर नगरात उष्माघातामुळे घायाळ अवस्थेत सापडलेल्या घारीला उपचार करून वीस दिवसांनंतर मंगळवारी प्राणीमित्रांच्या मदतीने निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात आलं. प्राणी संग्रहालयात तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या निगराणीखाली उपचार सुरू होते.
वीस दिवसांपूर्वी आयकर नगर येथून एका महिलेचा दुपारच्यावेळी वन्यजीवप्रेमी संस्थेच्या सदस्यांना मोबाईलवर कॉल आला. या परिसरात एक मोठा पक्षी घायाळ अवस्थेत पडला असल्याचे सांगण्यात आले. लागलीच प्रवीण जेऊरे व निकंदन जंगम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता घार क्षीण अवस्थेत तडफडत असल्याचे आढळून आले. तिच्यावर प्राथमिक उपचार करून प्राणी संग्रहालयात आणण्यात आले. वाढत्या तापमानामुळे ती चक्कर येऊन खाली पडली. अन्नपाण्याविना तिला अशक्तपणा आल्यामुळे तिची ही स्थिती झाल्याचा निष्कर्ष डॉ. नितीन गोटे, डॉ. भरत शिंदे यांनी काढला.
अशक्तपणामुळे तिला धड उडताही येत नव्हते. अशा स्थितीत तिला निसर्गाच्या सान्निध्यात सोडणे धोक्याचे ठरेल म्हणून प्राणी संग्रहालयामध्ये ठेवण्यात आले. पहिल्या दिवशी स्वत:हून खाद्यही खाता येत नव्हते. वन्यजीवप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी साखर पाणी, गुलकोज पाजवले. त्यानंतर दोन दिवस तिच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सदस्यांनी जबरदस्तीनं मांसाहार खाऊ घातला. तिच्या सुरक्षेसाठी मोठ्या पिंजºयात तिची रवानगी करण्यात आली. दोन दिवसांनंतर ताजेतवाने झाल्यानंतर ती स्वत:हून खाऊ लागली. दररोज भरपेट खाद्य दिल्याने हळूहळू तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेली. १५ दिवसांनंतर ती पिंजºयामध्येही उडू लागली. तिच्या पंखामध्ये बळ आल्याचे डॉ. गोटे आणि डॉ. शिंदे यांच्या लक्षात आले. आणखी पाच दिवस तिला ठेवण्यात आले. वीस दिवसांनंतर मंगळवारी २३ एप्रिल रोजी ती जिथे सापडली होती त्या आयकर नगर येथेच नेऊन निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले.
या उपक्रमासाठी वन्यजीवप्रेमी संस्थेचे मुकुंद शेटे, प्रवीण जेऊरे, निकंदन जंगम यांच्यासह सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच उष्माघाताने बळी जाऊ पाहणाºया घारीला जीवदान मिळाले.
...तर गतप्राण झाली असती
- आयकर नगर परिसरात उष्माघातानं भोवळ येऊन घार पडली असल्याचे या परिसरातून एका महिलेचा फोन आल्यामुळे वन्यजीवप्रेमी सदस्य तातडीने धावले. तिच्यावर वेळीच डॉक्टरांकडून योग्य उपचार करण्यात आले. यामुळे तिच्या पंखात बळ येऊन नव्याने जगण्याची ऊर्मी तिच्यामध्ये निर्माण झाली. याकडे कोणीच लक्ष दिले नसते, काही काळानंतर ती गत्प्राण झाली असती, अशी प्रतिक्रिया पशुवैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केली.