वीटभट्टी मजूर ठेकेदार महिलेचा सुस्तेत कोरोनाने बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:18+5:302021-05-27T04:24:18+5:30
सुस्ते : पती निधनानंतर वीटभट्टी मजूर ठेकेदारी करीत कुटुंब पोसणाऱ्या महिलेचा कोरोनाने बळी घेतला. या आजाराचा त्या चार दिवसांपासून ...
सुस्ते : पती निधनानंतर वीटभट्टी मजूर ठेकेदारी करीत कुटुंब पोसणाऱ्या महिलेचा कोरोनाने बळी घेतला. या आजाराचा त्या चार दिवसांपासून सामना करीत होत्या. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली.
रेखा अंकुश पाटोळे (वय ५२, रा. सुस्ते, ता. पंढरपूर) असे कोरोनाने बळी गेलेल्या महिलेचे नाव आहे.
रेखा यांचे पती अंकुश पाटोळे यांचे २० वर्षांपूर्वी निधन झाले होते. पती निधनानंतर त्या लहान तीन मुलींना घेऊन माहेरी सुस्ते येथे आल्या. कोणावर विसंबून न राहता लहान मुलींना सांभाळत त्यांनी वीटभट्टी ठेकेदारीचा व्यवसाय सुरू केला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पनवेल, कल्याण, कोल्हापूर याठिकाणी वीटभट्टीचे मजूर पाठवित व त्यांची देखभाल करीत होत्या.
चार दिवसांपूर्वीच त्यांच्यासह घरातील चौघांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर कोरोनाने त्यांना हिरावून नेले. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली, तीन भाऊ, जावई असा परिवार आहे.
---
स्वावलंबनातून चालवली ठेकेदारी
विधवा असतानाही वीटभट्टी मजुरांना सांभाळणे व त्यांची ठेकेदारी करणे, हे जोखमीचे काम पत्करले. अनेक वर्षांपासून त्या ही जबाबदारी पार पाडत होत्या. कोणावरही अवलंबून न राहता त्यांनी या व्यवसायात जम बसवला आणि त्या तिघींचा सांभाळ करून त्यांचा विवाह लावून दिला.
---
२६ रेखा पाटोळे