बोहल्यावरची बालवधू थेट पोहोचली बालगृहात; सोलापुरात रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 04:55 PM2021-12-30T16:55:00+5:302021-12-30T16:55:09+5:30
जिल्हा बालसंरक्षण कक्षाने कुमठ्यात रोखला बालविवाह
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे येथील एका १७ वर्षीय मुलीचा त्याच गावातील २६ वर्षीय युवकाशी होत असलेला बालविवाह जिल्हा बालसंरक्षण कक्षाने रोखला.
कुमठे (ता. उ.सोलापूर) येथे एका १७ वर्षीय मुलीचा विवाह गावातील २६ वर्षीय युवकाशी एका भवन कुमठा येथे बुधवार, २९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता होणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षास मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, चाइल्ड लाइनचे योगेश स्वामी, स्वप्निल शेट्टी, पोलीस कॉन्स्टेबल एस. जी. शिंदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल एन. एस. मड्डी यांचे पथक सकाळी ११ वाजता विवाहस्थळाच्या दिशेने रवाना झाले.
विवाहस्थळी पथक पोहोचले असता पथकाने अल्पवयीन मुलीची चौकशी केली. चौकशीअंती बालिकेचे वय १७ वर्ष ५ महिने असल्याचे दिसून आले. सबब बालिकाचा होणारा बालविवाह थांबवून बालिका व तिचे आई-वडील यांना ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनमध्ये मुलीला व तिच्या आई-वडिलांचा जबाब तसेच समज देऊन मुलीस बाल कल्याण समितीसमोर हजर केले. बाल कल्याण समितीने या मुलीची रवानगी बालगृहात केली आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, परिवीक्षाधीन अधिकारी दीपक धायगुडे, अनुजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
-------------
लग्न मंडपात गोंधळच गोंधळ...
बालसंरक्षण कक्षाची टीम लग्न मंडपात पोहोचली. होणारा बालविवाह रोखला. कागदपत्रे, विचारपूस करताना लग्न मंडपात वधू-वरांकडील प्रतिष्ठित लोकांमध्ये थोडा गोंधळ उडाला होता. विवाह रोखल्याची बातमी पाहुण्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली अन् सगळेच अवाक् झाले. कारवाईनंतर पथक मंडपाबाहेर गेल्यावर लग्न मंडपात एकदम शांतता पसरली होती.