बेगमपूर येथील पुल वाहतुकीसाठी खुला; कोल्हापूर- सोलापूर महामार्गावरील वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 07:21 PM2020-10-18T19:21:05+5:302020-10-18T19:21:26+5:30
आठ तास दुरुस्तीचे होते काम सुरू ; सर्व तपासण्या पूर्ण
मंगळवेढा : भीमा नदीला आलेल्या महापुराने तब्बल चार दिवस बंद असलेल्या मंगळवेढा--सोलापूर महामार्गावरील बेगमपुर पूल रविवारी सायंकाळी पाच वाजता पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
दरम्यान हा पूल वाहतुकीसाठी खुला व्हावा यासाठी महामार्ग अधिकारी व महसूल, पोलीस प्रशासनाचे अधिकारी आठ तास तळ ठोकून होते . उखडलेला रस्ता दुरुस्ती व सुरक्षा पाईप बसविल्यानंतर सर्व तपासण्या पूर्ण झाल्यावर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे.
बेगमपुर-माचणूर पुलावरील पाणी रविवारी पहाटे पूर्णतः ओसरले होते मात्र या महापुरात पुलावरील सुरक्षा कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेले तसेच सुरक्षा पाईप ही तुटून वाहून गेल्या होत्या . पुराच्या पाण्याच्या मोठ्या दाबाने रस्ता उखडला होता रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. यासाठी नागरिकांच्या सुरक्षतेसाठी संपूर्ण तपासणी करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले होते.
प्रारंभी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची दुरावस्था पहिली त्यानंतर त्यांनी पुलाच्या सुरक्षा पाईप बसविणे व उखडलेला रस्त्याची तात्काळ दुरुस्ती केली पोकलेन मशीन व डंपर चे तब्बल आठ तास काम सुरू होते.
सकाळी १० वाजल्यापासून सुरू असलेले काम सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते. सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर हा पूल अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला महसूल , पोलीस व महामार्ग विभागाचे अधिकारी यांनी मोठे परिश्रम घेतले.