पूल कोसळू लागताच त्या दोघांनी आरडोओरडा करून थांबविली शेकडो वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 10:38 AM2020-02-11T10:38:03+5:302020-02-11T10:45:24+5:30
दोघांच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे प्राण; उजनी कॅनॉलवरील पूल कोसळला, जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
पंढरपूर : पंढरपूर-सातारा रस्त्यावरील उजनी उजव्या कालव्यावर असणारा सुपलीजवळील पूल धोकादायक बनलेला होता. यासंदर्भात भीमा पाटबंधारे तसेच बांधकाम विभागाला स्थानिकांकडून याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही. सध्या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पर्यायी वाहतूक वेळापूरमार्गे वळवण्यात आली आहे. अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान दोन युवकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे अनेकांचे प्राण वाचल्याची माहिती पुढे आली आहे.
उजनी उजव्या कालव्यावरील सदर पुलाचे काम २८ वर्षापूर्वी करण्यात आलेले होते. दीड महिन्यापूर्वी पुलाखालील भिंतीची एक बाजू खचलेली होती. उजनी धरणातून पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये पूर्ण क्षमतेने कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले होते.
त्यानंतर पुलासाठी बांधण्यात आलेली भिंत अधिकच कमकुवत बनली होती. या कामासाठी हलक्या प्रतिचे मटेरियल वापरण्यात आले. बांधकामासाठी सिमेंटचा वापरही कमी प्रमाणात करण्यात आल्याचे समोर येत आहे. २८ वर्षापूर्वी बांधण्यात आलेला हा पूल अरूंद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे, भीमा पाटबंधारे विभागाचे कोंडेकर तसेच संबंधित ठेकेदार यांनी पुलाची पाहणी केली व पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना केली.
सध्या ज्या मार्गावरून वाहतूक वळविण्यात आलेली होती, त्याठिकाणीच दत्त मंदिर येथील पूलही धोकादायक बनलेला आहे. त्यामुळे त्याठिकाणहून जड वाहतूक बंद ठेवण्यात आलेली असून, वेळापूर मार्गे वळविण्यात आली आहे.
आरडाओरड करुन थांबवली वाहने
- रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सचिन माळी आणि अमोल घाटोळे हे दोघे तरूण पुलाच्या जवळच असणाºया बाकडांवर बसलेले होते. पूल पडल्यानंतर अचानक मोठा आवाज झाला. त्यावेळी अमोल व सचिन दोघेही पुलाच्या ठिकाणी धावून गेले व वाहने थांबविण्यास सांगितले. दोन्ही बाजूची वाहने थांबविणे सोपे नव्हते, त्यावेळी त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर आसपासची मंडळी घटनास्थळी आली. बॅरिकेड आडवे लावण्यात आले. त्यानंतर संबंधित ठेकेदाराचे वाहन त्याठिकाणी आडवे लावण्यात आले. पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तलाठी शेलार, मंडल अधिकारी मुजावर हे याठिकाणी दाखल झाले. सचिन माळी हे रात्री साडेतीन वाजेपर्यंत त्याठिकाणी थांबलेले होते.
नवीन पूल बांधण्याचे काम सुरू
- रात्री कोसळलेल्या पुलाचे बांधकाम पाडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून तत्काळ सुरू करण्यात आले आहे. कालव्यास पाणी आल्यानंतर अडचण येऊ नये यासाठी सिमेंट पाईप टाकून तात्पुरती व्यवस्था सध्या करण्यात येत आहे.