तिलाटी रेल्वे फाटकावर होईल पूल, 'डीआरएम'चा प्रस्ताव झाला तयार
By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 24, 2023 10:44 PM2023-02-24T22:44:59+5:302023-02-24T22:45:20+5:30
पंधरा दिवसांपूर्वी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी सोलापूर दौरा केला.
सोलापूर : तिलाटी रेल्वे फाटक क्रमांक ६१ वरून आता पूल बांधण्याची तयारी रेल्वे प्रशासन करीत आहे. याबाबतचा आराखडा तयार असून प्रस्ताव मंजुरीसाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे यांनी दिली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी सोलापूर दौरा केला. यात त्यांनी तिलाटी येथील रेल्वे फाटकाची पाहणी केली. या फाटकामुळे येथील नागरिकांना त्रास होत आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली. फाटकावरून पूल बांधण्याची विनंती त्यांनी केली. त्यानंतर महाव्यवस्थापकांनी देखील त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
फाटकावरून पूल बांधण्याकरिता सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. लालवाणी यांच्या दौऱ्यानंतर प्रस्तावित पुलाचा आराखडा बनवला आहे. यावर येथील नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. तिलाटी रेल्वे फाटकामुळे येथील नागरिकांना त्रास होत असल्याची बातमी 'लोकमत'ने प्रसिद्ध केली आहे. 'लोकमत'च्या बातमीमुळे प्रशासनाला जाग आल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे.