मोहोळमधील ब्रिटिशकालीन विहिरीचे झरे श्रमदानातून मोकळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 04:46 PM2019-12-20T16:46:34+5:302019-12-20T17:10:29+5:30
मोहोळ : शहरातील चाटी गल्ली परिसरात ब्रिटिश काळातील पिस्याची विहीर या नावाने परिचित असणाºया विहिरीतील गाळ श्रमदानातून काढण्यात आला ...
मोहोळ : शहरातील चाटी गल्ली परिसरात ब्रिटिश काळातील पिस्याची विहीर या नावाने परिचित असणाºया विहिरीतील गाळ श्रमदानातून काढण्यात आला आहे़.
चाटी गल्ली परिसरात १०० फूट खोल व चौकोणी आकारात कोरीव दगडात बांधलेली ब्रिटिश काळातील एक विहीर आहे. या विहिरीवरच त्या काळात शहरातील बहुतांश नागरिक पाणी प्यायचे, परंतु गेल्या ३५ वर्षांपासून ही विहीर बंद अवस्थेत आहे़ त्यामुळे या विहिरीत मोठ्या प्रमाणात घाण व कचरा पडला आहे. गावच्या टोकावर असणारी ही विहीर पिसे नावाच्या मालकीची आहे़ त्यामुळे या विहिरीला पिस्याची विहीर या नावाने ओळखले जाते.
शहरात होणारी नेहमीची पाणी टंचाई लक्षात घेऊन चाटी गल्ली येथील आबालवृद्धांनी एकत्र येऊन रोज दोन तास विहिरीची स्वच्छता केली़ गाळ काढण्याची जणू मोहीमच राबविली़ आपला परिसर स्वच्छ ठेवणे, आपले कर्तव्य आहे याचे भान ठेवून भविष्यातील पाणी टंचाई व पाण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी भटकंती कोठेतरी थांबावी, या उद्देशाने विहीर स्वच्छतेचे कार्य करण्यात आले आहे़ ही विहीर स्वच्छ झाल्यावर गल्लीतील नागरिकांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होणार आहे.
या सामाजिक उपक्रमात राहुल तावसकर, अमोल महामुनी, शेखर माने, मोहन पिलीवकर, संस्कार महामुनी, दादा गवळी, कुंडलिक चव्हाण, ज्ञानेश्वर गोटे, गणेश माळी, लक्षण कणसे, धनंजय गोटे यांच्यासह चाटी गल्लीतील तरुण परिश्रम घेत आहेत.
२००० जणांची तहान भागेल
- चाटी गल्लीतील विहीर स्वच्छ झाली आहे़ त्याचे झरे मोकळे झाले आहेत. या विहिरीतील पाणी यापुढे वापरता येणार आहे़ या चाटी गल्ली परिसरात जवळपास २ हजार नागरिक राहतात़ उन्हाळ्यात टंचाई जाणवते़ आता यापुढे पाणी साठा वाढणार आहे. मूळ मालकाचे योगदान आणि सर्वसमानांच्या इच्छेतून या २ हजार नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.