गेट तोडून वाळूचा टेम्पो पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:55+5:302021-03-05T04:22:55+5:30
दरम्यान, अशाच प्रकारे सुसाट वेगाने जाणारी वाळूची जप्त केलेली चार वाहने पळवून नेताना वाळूमाफियांनी एस. टी. आगाराचे गेट तोडून ...
दरम्यान, अशाच प्रकारे सुसाट वेगाने जाणारी वाळूची जप्त केलेली चार वाहने पळवून नेताना वाळूमाफियांनी एस. टी. आगाराचे गेट तोडून यापूर्वीही गेटचे नुकसान केले होते. मात्र, तहसील कार्यालयाकडून अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे आगार प्रमुखांनी सांगितले. दुसरीकडे तहसीलदारांनी वाळूच्या जप्त केलेल्या वाहनांच्या सुरक्षेसाठी १ मार्चपासून आगाराच्या गेटवर कोतवालाची नेमणूक केली आहे. मात्र, तो ड्युटीवरच नसल्याने हा प्रकार घडला.
कडलासचे तलाठी पिसे यांनी माण नदीपात्रातून विनापरवाना बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारी पाच वाहने पकडून बुधवारी सकाळी १० च्या सुमारास सांगोला आगारात आणून लावली होती. वाळूमाफियांनी गुरुवारी पहाटे सांगोला एस. टी. आगाराच्या संरक्षक भिंतीवरून आत उड्या मारल्या. त्या पाचपैकी एक टेम्पो चालू केला आणि गेट तोडून सुसाट वेगाने टेम्पो पळवून नेला. हा सारा प्रकार एस. टी.चे सुरक्षा अधिकारी रामा शिंदे यांच्यासमोर घडला. मी ते वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता तर माझ्या जीवावर बेतले असते, असे त्यांनी सांगितले. या घटनेची माहिती आगारप्रमुख पांडुरंग शिकार यांनी तहसीलदार अभिजित पाटील यांना दिली. तहसीलदारांनी संबंधित कोतवालास या टेम्पो मालकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.