सोलापुरातील मतदान केंद्रांवर तुटलेले दरवाजे, रॅम्पची व्यवस्थाही निष्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 01:16 PM2019-03-28T13:16:33+5:302019-03-28T13:21:08+5:30
निवडणूक निरीक्षक पी. उषाकुमारी यांनी कामाची पाहणी करून व्यक्त केली नाराजी
सोलापूर : जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवरील व्यवस्था अद्यापही अपूर्ण आहे. शहरातील काही मतदान केंद्रांवरील दरवाजे तुटलेले आहेत तर बºयाच ठिकाणी दिव्यांगांसाठी आवश्यक असलेले रॅम्पही निष्कृष्ट आणि तांत्रिकदृष्ट्या सदोष आहेत. या सर्व बाबींची पूर्तता तातडीने करुन घ्यावी, अशा सूचना निवडणूक आयोगाच्या निवडणूक निरीक्षक पी. उषाकुमारी यांनी दिल्या.
पी. उषाकुमारी यांनी सोलापूर शहरातील मतदान केंद्र्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार रमा जोशी, कृषी उपसंचालक रवींद्र माने उपस्थित होते. पी. उषाकुमारी यांनी बापूजी चौकातील मानेकरी प्रशाला, ज्ञानसागर प्रशाला, भारती विद्यापीठ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व्ही. जी. शिवदारे महाविद्यालय, वसुंधरा कला महाविद्यालय, ज्ञानज्योती प्रशाला येथील मतदान केंद्रांना भेट दिली.
शिवदारे महाविद्यालयातील मतदान केंद्रावर एक दरवाजा तुटलेल्या अवस्थेत होता. मानेकरी प्रशाला येथे दिव्यांगांसाठी रॅम्प व्यवस्थित नव्हता. भारती विद्यापीठ येथील रॅम्प आणि प्रवेशद्वार येथे दुरुस्ती आवश्यक होती. वसुंधरा महाविद्यालयातील रॅम्प तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे दिसून आले.
सी-व्हिजिलवरील तक्रारींचा निपटारा करा
- उषाकुमारी यांनी सी-व्हिजिल कक्षास भेट दिली. निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, कृषी उपसंचालक तथा संपर्क अधिकारी रवींद्र माने उपस्थित होते. आचारसंहिता भंगाबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्यात यावी. सी- व्हिजिल अॅपवर प्राप्त तक्रार त्वरित संबंधित विभागाकडे पाठवून तिचे निराकरण झाले किंवा नाही याबाबत पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.