शेतीच्या पाण्यासाठी भाऊ जीवावर उठला; हातापायावर उमटले लोखंडी गजाचे वळ
By विलास जळकोटकर | Published: May 16, 2023 05:35 PM2023-05-16T17:35:04+5:302023-05-16T17:35:45+5:30
शेतीला पाणी कमी पडत असल्याने सामाईक विहिरीवरील पाणी घेण्यासाठी गेलेल्या भावावर सख्या भावानं लोखंडी गजानं हाता पायावर वळ उठेपर्यंत मारहाण केली.
सोलापूर : शेतीला पाणी कमी पडत असल्याने सामाईक विहिरीवरील पाणी घेण्यासाठी गेलेल्या भावावर सख्या भावानं लोखंडी गजानं हाता पायावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असलेल्या भावजयीलाही काठीने, लाथाबुक्क्यानं मारहाण केली. ही घटना करमाळा तालुक्यातील सातोली येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजता शेतामध्ये घडली. या प्रकरणी भालचंद्र बबनराव साळुंखे (वय- ५०) यांनी भाऊ हरिश्चंद्र बबनराव साळुंखे (वय- ३५) व बबनराव ज्ञानदेव साळुंखे (वय- ३८) दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व आरोपी हे दोघे भाऊ आहेत. त्यांची सातोली येथे लगत शेती आहे. दोघांमध्ये सामाईक विहीर आहे. फिर्यादी भालचंद्र यांच्या शेतातील पिकाला पाणी कमी पडू लागले म्हणून तो विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेला होता. येथे दुसरा भाऊ हरिश्चंद्र याने का आला म्हणून विचारत पाणी वापरण्यास विरोध केला आणि यातून बाचाबाची होऊन हरिश्चंद्र व बबन ज्ञानदेव साळुंखे यांनी लोखंडी गजानं फिर्यादीला बेदम मारहाण केली. भांडण सोडवायला गेलेल्या भावजय विद्या साळुंखे यांना बबनराव याने काठी व लाथाबुक्क्यानं मारहाण केली. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास पोलीस नाईक कांबळ्य करीत आहेत.