बहिणीला आणायला गेलेल्या भावाने अपघातातील व्यक्तीची केली रक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:31+5:302021-08-23T04:24:31+5:30
करमाळा : रक्षाबंधन असल्याने बहिणीला आणण्यासाठी निघालेल्या महेश निकत या तरुणास वाटेत अपघात झाल्याचे दिसले. त्यात बेशुद्धावस्थेत असलेल्या ...
करमाळा : रक्षाबंधन असल्याने बहिणीला आणण्यासाठी निघालेल्या महेश निकत या तरुणास वाटेत अपघात झाल्याचे दिसले. त्यात बेशुद्धावस्थेत असलेल्या व्यक्तीच्या जवळ कोणीच जात नव्हते. तेव्हा महेशने क्षणाचा विचार न करता जखमी व्यक्तीला आपल्या गाडीत घेऊन करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तत्परतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला.
टेंभुर्णी-नगर मार्गावरून नवनाथ मारकड (रा. उमरड) हे कुंभेजफाट्यावरून उमरडकडे निघाले होते. हजारवाडीफाट्याजवळ गाडीचा तोल जाऊन त्यांचा अपघात झाला. त्यांच्या डोळ्या खाली व डोक्याला खूप मार लागला होता. ते बेशुद्धावस्थेत होते.
----
२५ मिनीटे जवळ कोणीच आले नाही
जखमी व्यक्तीजवळ २० ते २५ मिनिटे अनेकजण बघत उभे होते. पण, त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कोणीही तयार झाले नव्हते. तेव्हा कुंभेजफाट्यावर आल्यानंतर महेश निकत यांना अपघाताची माहिती मिळाली. तेव्हा निकत हे बहिणीला रक्षाबंधनसाठी आणायला शेटफळकडे निघाले होते. त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपली गाडी पोफळज रोडकडे फिरवली आणि जखमी व्यक्तीला आपल्या गाडीत घेऊन करमाळा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. आणखी दहा ते पंधरा मिनिटे उशीर झाला असता, तर कदाचित तो दगावला असता. त्यामुळे महेश निकत यांनी वेळीस माणुसकी दाखवत मदतीचा हात दिल्याने त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. त्यामुळे निकत यांची प्रशंसा होत आहे.
........
फोटो : २२ करमाळा
हजारवाडीफाट्याजवळील अपघातातील व्यक्तीला रुग्णालयात दाखल करताना महेश निकत.