समाजात बंधुता अत्यंत आवश्यक...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 03:14 PM2019-01-18T15:14:15+5:302019-01-18T15:16:10+5:30
संत किंवा राष्ट्रपुरुष कोणत्याच जाती-धर्माचे नसतात. मात्र, अनुयायांनी आपल्या व्यावहारिक सोयीसाठी आणि स्वार्थासाठी त्यांना जाती-धर्माच्या चौकटीत अडकवून ठेवले. बंधुतेचे ...
संत किंवा राष्ट्रपुरुष कोणत्याच जाती-धर्माचे नसतात. मात्र, अनुयायांनी आपल्या व्यावहारिक सोयीसाठी आणि स्वार्थासाठी त्यांना जाती-धर्माच्या चौकटीत अडकवून ठेवले. बंधुतेचे मारेकरी सर्व जाती-धर्माचे लोकच आहेत. यामुळे माणसामाणसातील बंधुभावनेला मोडीत काढण्याचे पाप केले जात आहे. समाजात परिवर्तन घडवायचे असेल तर बंधुता अत्यंत आवश्यक आहे.
भाषा हा सोहळ्यांचा नाही तर जगण्याचा विषय आहे अन् हे फक्तसाहित्यातील एक अलंकारिक वाक्य किंवा प्रेरक सुविचार नाही. याला भक्कम शास्त्रीय आधार आहे. ‘दुसरी भाषा शिकणे म्हणजे काही गोष्टींसाठी नवीन शब्द शिकणे असे नसून, गोष्टींबद्दल विचार करण्याचे दुसरे मार्ग शिकणे होय़’
वाचनसंस्कृती वाढवायची असेल, तर आपणच प्रयत्न करायला हवेत. पुस्तके वाचायला हवीतच; पण त्याचबरोबर माणसे वाचायला हवीत. निसर्ग वाचायला हवा. वाचनात वैविध्य हवे. स्थानिक लेखकांचे कौशल्य ओळखून त्यांचे साहित्यही आपण वाचायला हवे़ भारतीय लोकशाहीच्या गाभ्याचे अधिष्ठान स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या सूत्रावर आधारित आहे. मात्र, या मूल्यात्मक सूत्रांना आपण समान पातळीवर स्वीकारले आहे का? हा प्रश्नच आहे.
स्वातंत्र्य व समता या दोन तत्त्वांना अति महत्त्व देऊन राज्यकारभार केला. बंधुता नसेल तर या दोन तत्त्वांना अर्थ नाही. बंधुता तिसºया स्थानी आहे. मात्र, हे लक्षात घेतले पाहिजे की, बंधुताच शोषणमुक्त भारत निर्माण करू शकते. मुळात बंधुता ही संकल्पनाच भावना व विचार यांची एकात्मता सिद्ध करणारे मूल्य आहे. त्यामुळे बंधुतेच्या संकल्पनेत मानवता, करुणा, प्रेम, वात्सल्य, दया या मूल्यांचा अंतर्भाव आढळतो. समाजात परिवर्तन घडवायचे असेल तर बंधुता अत्यंत आवश्यक आहे. आज राष्ट्रपुरुष जातीजातीत विभागले गेले आहेत, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्त्वे समृद्ध केली पाहिजेत.
गुन्हेगारालाही माणूस म्हणून समजून घेण्याच्या भूमिकेत बंधुताच निर्णायक दिसते. सूडभावनेपेक्षा बंधुता श्रेष्ठ ठरते. जागतिक पेच सोडवितानाही राष्ट्रा-राष्ट्रातील संवाद महत्त्वाचा ठरतो. माणसाच्या जगातील सर्वप्रकारच्या भेदांना नाहीसे करण्यासाठी बंधुता उपयोगी ठरते. त्यामुळे श्रीमंत-गरिबात बंधुता आणण्याची गरज आहे. बंधुतेशिवाय समता पेरली जाऊच शकत नाही. बंधुतेची उपेक्षा जगाला परवडणारी नाही. तिसºया महायुद्धालाही बंधुताच तारू शकते.
ज्या भाषेच्या आधारावर हे साहित्य व संस्कृती उभी आहे, त्याबाबत फारसे बोलले जात नाही. अन् बोलले गेलेच तर केवळ बोलाची कढी अन् बोलाचा भात अशी परिस्थिती असते. त्यातून प्रत्यक्ष पानात काहीच पडत नाही. भाषा हा सोहळ्यांचा नाही, तर जगण्याचा विषय आहे. अन् हे फक्त एक साहित्यातील अलंकारिक वाक्य किंवा प्रेरक सुविचार नाही. याला भक्कम शास्त्रीय आधार आहे. आपण बोलत असलेल्या भाषेचा आपल्या विचारप्रक्रियेवर परिणाम होतो का, यावर संशोधक अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत.
आपली संस्कृती-परंपरा, जीवनशैली, सवयी अशा आपल्या सवयीचे भाग असलेल्या गोष्टी आपण आपल्या जीवनातून घेतो आणि आपण त्या पद्धतीनेच विचार करायला लागतो. आपली अभिव्यक्तीही त्यानुसारच होत असते. भाषा, संस्कृती आणि विचारांची सवय या सर्व गोष्टी बहुतेकदा एकत्रच वाढतात. जर तरुण पिढीच्या झुंडीच्या झुंडी मराठीची कास सोडून इंग्रजीचा पदर धरत असतील तर त्यांची विचारप्रक्रियाही वेगळी होणार. थोडक्यात म्हणजे मराठी संस्कृतीचा एक लचकाच आपण तोडत आहोत. दरवर्षी लाखो विद्यार्थी या हिशेबाने हे लचके तोडले जात आहेत. निकडीचा विषय तो आहे, आपल्या हातात घ्यायचा विषय तो आहे. ही लचकेतोड थांबवायची असेल, तर भाषा हा वार्षिक सोहळ्यातील एक दागिना होता कामा नये, तो आपल्या जगण्याचा विषय व्हावा!
-सूर्यकांत खटके,
(लेखक हे सोलापूर येथे अप्पर कोषागार अधिकारी आहेत)