BRS: ‘महाराष्ट्रातील सर्व विधानसभा बीआरएस लढविणार’, केली जोरदार मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 12:12 PM2023-06-28T12:12:41+5:302023-06-28T12:13:05+5:30
BRS News: महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात बीआरएस पक्ष उमेदवार देणार आहे, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी सरकोली येथे सांगितले.
पंढरपूर - महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात बीआरएस पक्ष उमेदवार देणार आहे, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी सरकोली येथे सांगितले.
केसीआर हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर होते. मंगळवारी सरकोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावेळी मेळाव्याला संबोधित करताना राव यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वावर टीका करत महाराष्ट्रात परिवर्तनाची हाक दिली. शेतकरी मेळाव्यात ‘अबकी बार, किसान सरकार’ अशी घोषणा देत, बंगारू तेलंगणाचा (गोल्डन तेलंगणा) विकास पॅटर्न महाराष्ट्रात अभिमानाने राबविणार असल्याचे सांगितले.
यावेळी बीआरएस पक्षाचे महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, बाळासाहेब देशमुख, माणिकराव कदम, तसेच अर्थमंत्री हरीश राव व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्रिपदाची ऑफर : राजू शेट्टी
कोल्हापूर : भारत राष्ट्र समितीकडून (बीआरएस) मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, गेल्या वेळी गुजरात मॉडेलच्या आमिषाने फसगत झाली आहे. आता केसी राव यांच्या आश्वासनाला फसणार नाही. एकला चलोची भूमिका आहे. स्वाभिमानी हातकणंगलेसह राज्यातील चार लोकसभेच्या जागा लढविणार आहे. प्रसंगी बारामतीची जागाही लढणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.