शांततेसाठी थायलंडने धाडली सोलापूरसाठी बुद्धमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 02:53 PM2018-08-22T14:53:12+5:302018-08-22T14:56:13+5:30
नालंदा बुद्धविहारात स्थापना : जागतिक शांतीसाठी उचलले पाऊल
सोलापूर : थायलंड सरकारने जागतिक शांततेसाठी प्रयत्न सुरू केले असून, यासाठी ते विविध देशांना गौतम बुध्दांची मूर्ती भेट देत आहेत. बुध्दांना करूणाशील म्हणून संबोधले जाते. त्यांनी मानवाला शांतीचा संदेश दिला. हाच संदेश देशादेशात पोहोचण्यासाठी थायलंडने हे पाऊल उचलले असून. तेथून आलेल्या बुध्दमूर्तीची विजापूर रोडवरील नालंदा बुध्द विहारात भन्ते बी. सारीपुत्त यांच्या हस्ते रविवारी स्थापना झाली.
थायलंडवरून ही मूर्ती सोलापुरात आली असली तरी या मूर्तीचा प्रवास आणि ती येथे आणण्यामागील भावनाही तेवढीच महत्त्वाची आहे.
नालंदा नगरातील या बुद्धविहाराशी संबंधितांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मूर्ती २२५ किलोग्रॅम वजनाची असून साडेसहा फूट उंचीची आहे.
अर्धोन्मलित नेत्र आणि ध्यानमुद्रेत असणाºया या मूर्तीच्या चेहºयावरील धीरगंभीर भाव, तेज, शांती आणि प्रसन्नता पाहिल्यावर मन शांत होते. जगाला शांतीचा संदेश देणाºया गौतम बुद्धांच्या या मूर्तीला सोन्याचा मुलामा असून अत्यंत आकर्षक असलेली ही मूर्ती तेवढीच देखणीही आहे. सध्या सुरू असलेल्या वर्षावासात सोलापुरात आणलेली ही बुद्धमूर्ती समाजाला शांतीचा संदेश देईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
असा झाला मूर्तीचा प्रवास...
- थायलंड ते सोलापूर हा हजारो मैलाचा प्रवासाचा टप्पा पार करून गौतम बुद्धांची मूर्ती सोलापुरात पोहोचली कशी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी थायलंड सरकारने या मूर्ती मोफत देण्याची योजना आखली आहे. गुजरातमधील संघकाया फाउंडेशनच्या माध्यमातून अशा अनेक मूर्ती भारतात आल्या आहेत.
थायलंडवरून अत्यंत काळजीपूर्वक या मूर्ती बोटीने मुंबईत आणल्या जातात. तेथून कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यावर संघकाया फाउंडेशनच्या माध्यमातून आधी ठरल्यानुसार या मूर्ती संबंधित संस्था अथवा मंडळांना सोपविल्या जातात. सोलापुरात आणलेल्या या मूर्तीचा प्रवासही असा झाला असून कल्याणमधील वाशिदवरून ही मूर्ती ट्रकमधून सोलापुरात आणण्यात आली. त्यानंतर ती नालंदा बुद्धविहारात स्थापन करण्यात आली.
बुद्धांचा धम्म हा विश्व कल्याणाचा मार्ग - भन्ते बी. सारीपुत्त
- तथागत गौतम बुद्धांनी जगाला दिलेला शांतीचा संदेश आणि दिलेला धम्म हा विश्व कल्याणाचा मार्ग आहे. बुद्ध धम्माचे आचरण केल्यास प्रत्येकास समाधान लाभेल, असे प्रतिपादन भन्ते बी. सारीपुत्त यांनी नालंदा बुद्धविहारातील मूर्तीच्या स्थापनेप्रसंगी केले. भन्ते सारीपुत्त यांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बुद्धवंदना करण्यात आली. माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, माजी नगरसेवक अरुण भालेराव, अजित गायकवाड, बसपाचे राज्य प्रभारी संजीव सदाफुले, बौध्द महासभेचे अण्णासाहेब वाघमारे, धम्मरक्षिता कांबळे, प्रा. डॉ संघप्रकाश दुड्डे, बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, बुद्धविहार संस्थेचे अध्यक्ष शरद वाघमारे, जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षा माया लोंढे उपस्थित होते.