सोलापूर विद्यापीठाचा २७८ कोटीचा अंदाजपत्रक अधिसभेत मंजूर
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 14, 2023 18:56 IST2023-03-14T18:55:11+5:302023-03-14T18:56:05+5:30
सोलापूर विद्यापीठाचा २७८ कोटीचा अंदाजपत्रक अधिसभेत मंजूर झाला आहे.

सोलापूर विद्यापीठाचा २७८ कोटीचा अंदाजपत्रक अधिसभेत मंजूर
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा वार्षिक अंदाजपत्रक मंगळवारी सादर झाला असून विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ५४ कोटी अन् अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी साडे चौदा कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकूण २७८ कोटीच्या अंदाजपत्रकास अधिसभेने मंजुरी दिली आहे. सदस्यांनी सूचना मांडल्यानंतर बजेट मध्ये किरकोळ दुरुस्ती करण्याचे मान्य करण्यात आले.
चालू शैक्षणिक वर्षाच्या अंदाजपत्रकात २४० कोटी ४० लाख ७५ हजार रूपये इतकी अपेक्षित जमा रक्कम धरून विद्यापीठाने २७८ कोटीचा बजेट सादर केला आहे. यात ३७ कोटी ७६ लाख २० हजार ५०० रूपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. विद्यार्थी विकास आणि संशोधनासाठी या अंदाजपत्रकात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे.
मंगळवारी, विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक पार पडली. या बैठकीत विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणीक शाह यांनी अंदाजपत्रक सादर केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते. या सभेचे सचिव म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी काम पाहिले.