वादळी वाऱ्याने झाडाची फांदी अंगावर पडल्याने म्हैस अन् रेडीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:04+5:302021-06-03T04:17:04+5:30
सांगोला तालुक्यात १५ मे नंतर वातावरणात बदल होत गेल्याने जोरदार वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू लागला आहे. सध्या ...
सांगोला तालुक्यात १५ मे नंतर वातावरणात बदल होत गेल्याने जोरदार वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू लागला आहे. सध्या ग्रामीण भागात दररोज कुठे ना कुठे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. खरीप पेरण्यापूर्वी पाऊस पडू लागल्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास वादळी वाऱ्यात बामणी रोडवरील मानेवस्ती येथील बबन नाना माने यांची म्हैस व रेडी घरासमोरील झाडाखाली बांधली होती. वादळी वाऱ्यात त्याच झाडाची फांदी तुटून म्हैस व रेडीच्या अंगावर पडल्याने जागीच मरण पावल्या. या वादळी वाऱ्यात टकलेवस्ती येथील कुंडलिक सोपान टकले यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा पोचली नाही.
घटनेची माहिती समजताच तलाठी विकास माळी यांनी मृत म्हैस व रेडीचा तसेच पत्रे उडून गेलेल्या घराचा पंचनामा केला. बबन माने व कुंडलिक टकले यांचे सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.