चिखर्डेतून पळविलेल्या म्हशी पोलिसांनी पकडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:26 AM2021-09-14T04:26:57+5:302021-09-14T04:26:57+5:30
कुसळंब : बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथील शेतकऱ्याची जनावरे चोरून त्यांची परस्पर विक्री करणाऱ्याला पांगरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...
कुसळंब : बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथील शेतकऱ्याची जनावरे चोरून त्यांची परस्पर विक्री करणाऱ्याला पांगरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक करून दोन मुरा जातीच्या म्हशी ताब्यात घेतल्या आहेत.
सुनील ऊर्फ बप्पा मधुकर कोंढारे (रा. चिखर्डे, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पांगरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चिखर्डे (ता. बार्शी) येथील शेतकरी राजेश कल्याणराव गवळी (वय ४०) यांची बहीण सुरेखा नरेंद्र पाटील यांच्या चिखर्डे शिवारातील शेतात गोठ्यातून चार म्हशी व दोन गाई आहेत. त्यासाठी एक गडी ठेवला आहे. ११ ते १२ सप्टेंबर दरम्यान जनावराच्या धारा काढण्यासाठी गोठ्यात तो गेला असता त्यास दोन म्हशी दिसल्या नाहीत. मालक राजेश गवळी यांना फोन करून सांगितले. त्या दोघांनी जनावरांचा शोध घेतला; परंतु त्या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी पांगरी पोलिसांत दीड लाखाच्या म्हशी चोरीला गेल्याची फिर्याद दिली. पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश चौगुले व पोलीस नाईक पांडुरंग मुंडे यांच्या पथकाने शोध घेतला. या दोन पोलिसांनी उस्मानाबाद तेरखेडा वाशी भाग पिंजून काढला; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. अखेरी खबऱ्याच्या माहितीवरून सुनील ऊर्फ बप्पा मधुकर कोंढारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. बाळासाहेब केशव कुलकर्णी यांच्या शेतातील लिंबोणीच्या बागेत बांधलेल्या दोन म्हशी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. अधिक तपास हवालदार शैलेश चौगुले हे करीत आहेत.