प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत झाली जीर्ण; स्लॅबला लागली गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:27 AM2021-09-09T04:27:43+5:302021-09-09T04:27:43+5:30
वाखरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची इमारत तब्बल ३५ वर्षे जुनी आहे. ही इमारत त्यावेळी सिमेंटचे पिलर घेऊन न उभारता ...
वाखरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची इमारत तब्बल ३५ वर्षे जुनी आहे. ही इमारत त्यावेळी सिमेंटचे पिलर घेऊन न उभारता लोड बेअरिंग पद्धतीने बांधली असून त्याची टिकाऊ क्षमता संपल्याने ती मोडकळीस आली आहे. संपूर्ण इमारत धोकादायक झाली आहे. सध्या पावसाळ्यातील संततधारेमुळे इमारतीच्या अनेक खोल्यांच्या स्लॅबचे तुकडे पडताना दिसून येत आहेत. कार्यालयीन दप्तर, मेडिसीनचा साठाही यामुळे भिजून खराब होत आहे. इमारत डागडुजी करण्याच्याही पुढे गेली असून ती पाडून नव्याने बांधण्याची गरज निर्माण झाली आहे.
सध्या कोरोनाकाळात उपकेंद्रांतील वैद्यकीय कर्मचारी अतिशय जोखीम घेऊन काम करत आहेत. वाखरी परिसरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने आढळत असतात. त्यामुळे कामाचा ताण कायम असताना वरून इमारत धोकादायक बनल्याने जीव मुठीत धरून वैद्यकीय कर्मचारी काम करत आहेत. रुग्णांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. त्याची दखल घेऊन घेऊन तालुका आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने अन्य ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करून नव्या इमारतीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.
स्ट्रक्चर ऑडिट झाले; निधी मिळेना
वाखरी आरोग्य केंद्राची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक बनली आहे. हे लक्षात घेऊन गेल्या एक वर्षांपूर्वी आरोग्य विभागाने पंढरपूर येथील विठ्ठल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून या इमारतीचे पूर्ण स्ट्रक्चर ऑडिट करून घेऊन ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेला दिला आहे. त्यानंतर तरी या इमारतीसाठी निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र निधी उपलब्ध झाला नसल्याचे झेडपी सदस्या सविता निखीलगीर गोसावी यांनी सांगितले.
कोट ::::::::::::::::
त्या-त्यावेळी याबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य विभागाला पाठविले आहेत. आता सध्याची परिस्थिती बघून त्याबाबत नव्याने प्रस्ताव पाठविले जातील. रुग्ण, कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊ.
- डॉ. एकनाथ बोधले
तालुका आरोग्य अधिकारी
कोट ::::::::::::
वाखरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा मिळत आहे. मात्र, उपकेंद्रांची इमारत ३० ते ३५ वर्षे जुनी आणि धोकादायक झाली आहे. आरोग्य विभागाने नव्या इमारतीसाठी प्रयत्न करावेत, अशी आमची मागणी केली आहे.
- कविता पोरे,
सरपंच, वाखरी
फोटो :::::::::::::::
वाखरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची झालेली दुरावस्था दिसत आहे.