सलगरमध्ये आदेश झुगारून बैलांची शर्यत; पोलिसांकडून लाठीचार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:05+5:302021-06-26T04:17:05+5:30
पोलीस सूत्रांनुसार सलगर येथे बैल पोळ्यानिमित्त बैलांची शर्यत एकेकाळी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होती. मात्र, दोन वर्षांपासून त्याला पोलिसांच्या मदतीने ...
पोलीस सूत्रांनुसार सलगर येथे बैल पोळ्यानिमित्त बैलांची शर्यत एकेकाळी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होती. मात्र, दोन वर्षांपासून त्याला पोलिसांच्या मदतीने ब्रेक लागला होता. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम आहे. तो तंताेतंत पाळला जावा म्हणून सकाळपासून बंदोबस्तासाठी सपोनि. देवेंद्र राठोड, पोलीस महेश कुंभार, आंबदास दूधभाते, सतीश अवले, पोलीस उपनिरीक्षक पुजारी, पोलीस उपाध्ये, गोडसे आदींचा फौजफाटा तैनात होता. तरीही दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नेहमीचे हनुमान मंदिर वगळून गावाच्या बाहेर असलेल्या श्री सोमेश्वर मंदिराजवळील रथाच्या बाजूने शेकडो लोकांनी अचानकपणे येऊन बैलांची शर्यत पार पाडली. यामुळे एकच गोंधळ उडाला.
दरम्यान पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावावर, लोकांवर लाठीचार्ज करावा लागला.
त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी गंभीर्याने घेत तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यावेळी पोलिसांनी व्हिडिओमधील चेहरे ओळखून संध्याकाळी ९ ते १० लोकांना ताब्यात घेतले. उर्वरित लोकांची ओळख परेड सुरू होती. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
२५अक्कलकोट १,२,३
सलगर येथे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जुगारून बैल पोळा (कारहुणवी) निमित्त बैलाची शर्यत पार पडल्याचे दिसत आहे.