सराफावर हल्ला प्रकरण, चार दरोडेखोरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:22 AM2021-03-27T04:22:48+5:302021-03-27T04:22:48+5:30
सराफ दुकानदार मल्लिकार्जुन पोतदार यांचे तडवळ येथे सोन्याचे दुकान आहे. मंगळवारी दुकान बंद करून आपले बंधू सचिन पोतदार ...
सराफ दुकानदार मल्लिकार्जुन पोतदार यांचे तडवळ येथे सोन्याचे दुकान आहे. मंगळवारी दुकान बंद करून आपले बंधू सचिन पोतदार यांच्यासोबत घरी जात होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तडवळ-मुंडेवाडी रोडवर असलेल्या रेल्वे गेटजवळ विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी या दोघा सराफाच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळील दागिन्याची बॅग हिसकावून घेतली. दरम्यान सचिन यांनी त्यातील रवी राजकुमार जमगे (वय २५, रा. गादगी, औराद, जि. बिदर, कर्नाटक) याला मिठी मारून पकडले. नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी रवीकडे चौकशी केली असता भावासोबत आल्याचे सांगत इतरांची अर्धवट नावे सांगितली. दरम्यान, यातील दरोडेखोरांनी राजा नसिरुद्दीनसाब सौदागर (वय २२, रा. अलमेल, सिंदगी, कर्नाटक) याच्याकडे जाऊन ती दागिन्याची बॅग शेतात पुरून ठेवली. तसेच दरोडेखोरांनी आपण पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी आपले मोबाइल फोडले. तसेच राजाच्या मोबाइलमधील सर्व नंबर डिलीट करून तेथून पसार झाले.
दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकास तांत्रिक पद्धतीने विश्लेषण करून गुन्ह्यातील दरोडेखोर कर्नाटकातील असल्याचा शोध लावला. या प्रकरणातील राजा सौदागर, गणेश अर्जुन मरगूर (वय २५, रा. गुब्बेवाड, ता. इंडी, जि. विजापूर, रा. कर्नाटक), रवी जमगे यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ८५४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ७८७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ४१ लाख ६० हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहा. फौजदार ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी केली.
चार महिन्यांपूर्वी ठरला प्लॅन
राजा, रवी आणि इतर दरोडेखाेरांची ओळख कर्नाटकातील एका हॉटेलमध्ये जेवताना झाली. यावेळी बिदरमधील दरोडेखोरांनी राजा याला काही लुटालुटीचे मोठे काम असेल तर सांगा? आम्ही ते काम करून तुम्हालाही वाटणी देतो, असे सांगितले होते. तेव्हापासून सर्वांची जवळीक वाढली. तेव्हाच सराफाला लुटण्याचा प्लॅन तयार केला. यासाठी तडवळे येथील एका स्थानिक व्यक्तीला देखरेखीसाठी सांगितले. त्यानंतर प्लॅन करून दरोडेखोरांनी सराफाला लुटल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणातील देखरेख करणाऱ्याला गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर उर्वरित दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.
कोट :::::::::
अक्कलकोट तालुक्यात भरदिवसा सराफाला लुटण्याची घटना घडल्याने तात्काळ याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ४८ तासांतच दोघांना ताब्यात घेतले. नंतर या घटनेचा उलगडा केला. यामुळे या कर्मचाऱ्यांना बक्षीसही देण्यात येणार आहे.
-तेजस्वी सातपुते,
पोलीस अधीक्षक