लसीकरणचा बोजवारा... नागिरकांचा कोंडमारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:08+5:302021-04-09T04:23:08+5:30
: तीन - चार दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असताना गुरुवारी उपलब्ध झालेला २ हजार लसीचा डोसही गर्दीमुळे दुपारीच ...
: तीन - चार दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असताना गुरुवारी उपलब्ध झालेला २ हजार लसीचा डोसही गर्दीमुळे दुपारीच संपला. रांगेतील नागरिकांना लसीविना परत फिरावे लागले.
ज्येष्ठ नागरिक व ४५ वयाच्या पुढील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कोविड प्रतिबंध लसीचाच तुटवडा येथे निर्माण झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करताच येथील शहरी व ग्रामीण आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. वरिष्ठ पातळीवरून कुर्डूवाडी शहर व तालुक्यासाठी २ हजार कोविड लसीचे डोस उपलब्ध करून दिले. मात्र, तेही ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील आरोग्य केंद्रात प्रचंड गर्दी झाल्यामुळे दुपारी दीड वाजताच ते संपले. त्यामुळे तर लस घ्यायला आलेल्या लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिसांना पाचारण करावे लागले
कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात तर लाभार्थ्यांची रांग करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांना येथील पोलिसांनाच पाचारण करावे लागले. तरीही ते कोणाचेच ऐकत नव्हते. आम्हाला आधी लस द्या म्हणत गोंधळ घालत होते. शेवटी तेथील लस संपल्यानंतर लाभार्थ्यांनी आपले घर गाठले.
---
मानसिकता झाली अन् तुटवडा निर्माण झाला
कोविड प्रतिबंध लस घेण्यासाठी बऱ्याच दिवसांंपासून येथील ज्येष्ठ नागरिक गैरसमजुतीतून आढेवेढे घेत होते. मात्र, त्यांच्या मनातील भीती कमी करण्यात यंत्रणेला यश आल्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता कोविड लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याचे दिसून आले.
दहा केंद्रांवर लसीकरण
तालुक्यात माढा, कुर्डूवाडी, मोडनिंब, टेंभुर्णी, पिंपळनेर, उपळाई बुद्रुक, परिते, आलेगाव, मानेगाव, रोपळे (क) अशा एकूण १० केंद्रांमध्ये लसीकरण देण्याचे काम सुरू आहे. त्यात कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये ३ फेब्रुवारी ते ८ एप्रिल दरम्यान एकूण लसीकरण ४ हजार ४९७ झाले आहे. यात पहिल्या डोसचे ३ हजार ८२८ व दुसऱ्या डोसचे ६६९ असे लसीकरण आतापर्यंत झाले आहे.
....................
कोट- तालुक्यात गुरुवारी कोविड लसीकरणासाठी २ हजार प्रतिबंधात्मक लसीचे डोस उपलब्ध झाले होते. आपण जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे ५ हजार डोसची मागणी केली होती. लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने सर्व आरोग्य केंद्रातील लस गुरुवारी दुपारीच संपली. वरिष्ठांकडे नव्याने लसीची मागणी केली आहे. ती प्राप्त झाल्यानंतर पुन्हा लसीकरण पूर्ववत होईल.
- डॉ. शिवाजी थोरात, तालुका आरोग्य अधिकारी, माढा
कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात सलग तीन दिवस लसीचा तुटवडा झाला होता. त्यानंतर गुरुवारी लसीकरण सुरू झाल्याचे ऐकताच यातील लाभार्थ्यांनी रुग्णालयात रांग न करता व फिजिकल डिस्टन्स न ठेवता लसीकरण करण्यासाठी प्रचंड गर्दी केली.
----०८कुर्डूवाडी-लस