कोरोनाग्रस्ताच्या घरी चोरी; दीड लाखांसह सोन्या-चांदीचे दागिने लंंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 04:02 PM2020-06-09T16:02:26+5:302020-06-09T16:07:25+5:30
संग्रामनगर येथील घटना; प्रतिबंधात्मक क्षेत्र असताना चोरी झालीच कशी ?
अकलूज : संग्रामनगर-अकलूज येथे कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने प्रतिबंधात्मक विभाग म्हणून संग्रामनगरचा प्रभाग बंद असताना विलगीकरण केंद्रात कोरोनाग्रस्त कुटूंब उपचार घेऊन कोरोनामुक्त होत घरी परत येईपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत सुमारे १ लाख २५ हजाराची रोकड रकमेसह सुवर्ण अलंंकार लंपास करुन घराची सफाई केली़ कोरोनाग्रस्त कुटुुंब कोरोनाच्या एका संकटातून बरे होऊन घरी परत येतोय ना येतोय तोच दारात दुसरे संकट आ वासून उभे राहिल्याची घटना संग्रामनगर-अकलूज येथे घडली.
संग्रामनगर येथील किराणा व्यापाºयाच्या घरातील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्या दोघांना उपचारासाठी नेण्यात येऊन परिवारातील इतर व्यक्तींना तपासणी करुन वेळापूर येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. चौदा दिवसाच्या कालावधीत घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून व खिडक्यांचे गज कापून घरात प्रवेश करीत घरातील रोख रक्कम १ लाख २५ हजार रुपये लंपास केल्याची फिर्याद अकलूज पोलीस ठाण्यात दिली आहे.
घरात सोने होते. घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या असून कोरोना बाधीत व्यक्ती अद्याप घरी परत आल्या नसल्यामुळे किती सोन्याचे दागिने चोरीस गेलेत याचा अंदाज नाही. त्याबाबत खाञी करुन नंतर माहिती देऊ असे फियार्दीने पोलीसांना सांगितले आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर करीत आहेत.