महामार्ग रोखून आंदोलकांकडून नेत्यांच्या प्रतिमेचे दहन
By दिपक दुपारगुडे | Published: October 31, 2023 05:49 PM2023-10-31T17:49:17+5:302023-10-31T17:49:43+5:30
या रास्ता रोको आंदोलनावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा प्रकारच्या घोषणाबाजी करून परिसर दणाणून गेला होता.
दीपक दुपारगुडे
सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजबांधवांनी काल मंगळवारी सांगोला-पंढरपूर महामार्गावरील मेथवडे फाटा येथे महामार्ग रोखून धरला. या वेळी आंदोलकांनी नेत्यांच्या यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
या रास्ता रोको आंदोलनावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा प्रकारच्या घोषणाबाजी करून परिसर दणाणून गेला होता. या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी समाजबांधव रस्त्यावर उतरल्याने दिवसेंदिवस आंदोलनाची धग वाढत चालली आहे. दरम्यान, सांगोला शहरासह तालुक्यातील गावागावांत साखळी उपोषणे, धरणे आंदोलने, मशाल मोर्चा कॅण्डल मार्च, रास्ता रोको सर्वपक्षीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी, अशा प्रकारचे आंदोलन होऊ लागले आहेत. काल मंगळवार ३१ रोजी सांगोला तालुक्यातील मेथवडे फाटा येथे समाजबांधवांच्या वतीने सांगोला-पंढरपूर महामार्ग रोखून धरल्यामुळे काही काळासाठी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी आंदोलकांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या प्रतिमेचे रस्त्याच्या मध्यभागी दहन केले. या वेळी मराठा समाजबांधवांनी सहायक पोलीस निरीक्षक पवन मोरे, मंडलाधिकारी विजया नाईक यांना निवेदन दिले.