पुण्याकडे जाणाऱ्या बसेस होतायेत अहिल्यादेवी चौकापासून मार्गस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:15 AM2021-07-05T04:15:05+5:302021-07-05T04:15:05+5:30
पंढरपूर बसस्थानक शहर व उपनगरातील नागरिकांना लांब होत असल्याने प्रवाशांना तिथपर्यंत जाणे अडचणीचे होत होते. त्यासाठी परिवहन महामंडळाने ...
पंढरपूर बसस्थानक शहर व उपनगरातील नागरिकांना लांब होत असल्याने प्रवाशांना तिथपर्यंत जाणे अडचणीचे होत होते. त्यासाठी परिवहन महामंडळाने शिवाजी महाराज चौकापासून लिंकरोडवरील प्रवासी घ्यावेत, अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने आगार प्रमुख सुधीर सुतार यांचेकडे समक्ष भेटून केली होती.
प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली ही बससेवा कायम चालू राहण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानक प्रमुख रत्नाकर लाड यांनी केले आहे. यावेळी ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हाध्यक्ष विनोद भरते, जिल्हा कोषाध्यक्ष सुहास निकते, दीपक इरकल, नंदकुमार देशपांडे, तालुकाध्यक्ष अण्णा ऐतवाडकर, उपाध्यक्ष पांडुरंग अल्लापूरकर, संघटक विनय उपाध्ये, सहसंघटक महेश भोसले, सचिव आझाद अल्लापूरकर, सहसचिव प्रा. धनंजय पंधे, कुमार नरखडे, डॉ. प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होते.
असा असणार मार्ग
शिवशाही (पंढरपूर-पुणे) बस सकाळी ६, ९, ११ वाजता व विठाई बस सकाळी ७, ८, १० वा. पंढरपूर बसस्थानक येथून निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बजाज रक्तपेढी, भक्त निवास, अहिल्या चौक येथून सावरकर पथ (स्टेशन रोड), कराड नाका, ठाकरे चौक, कॉलेज चौकामार्गे पुण्याकडे जातील. तर पूण्याहून पंढरपूरसाठी शिवशाही दुपारी ३ वाजता, सायंकाळी ५ वाजता, तर विठाई दुपारी २ वाजता, ४ वाजता, सायंकाळी ६ वाजता निघणार आहे. या बस कॉलेज चौकापासून कराड नाका, तहसील कार्यालयामार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, रक्तपेढी, भक्तनिवास, अहिल्या चौक येथून सावरकर पथ (स्टेशनरोड)मार्गे बसस्थानकावर पोहोचतील.