संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवेच्या बोगस पासचा धंदा; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:55 AM2020-04-30T05:55:30+5:302020-04-30T05:55:40+5:30

पंढरपुरात बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघास ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

The business of bogus passes of essential services in curfews; Both arrested | संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवेच्या बोगस पासचा धंदा; दोघांना अटक

संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवेच्या बोगस पासचा धंदा; दोघांना अटक

Next

पंढरपूर : एकीकडे कोरोना व्हायरसमुळे भीतीचे सावट पसरलेले आहे. त्यातच लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर फिरणेही मुश्किल बनले आहे. पंढरीत दोघा बहाद्दरांनी शक्कल लढवून चक्क अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडण्यासाठी असणारे बनावट पास तयार करण्याचा फंडा आखला आणि हे पास ३०० रुपयास विकण्याचा धंदा चालवला. पंढरपुरात बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघास ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
शहरात जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा करणाऱ्या लोकांना नगरपालिका प्रशासनाकडून पास देण्यात आले आहेत. शिवाय नगरसेवक व त्यांच्या पाच स्वयंसेवकांनाही पासेस देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा देणारे लोक निर्भीडपणे बाहेर पडत असल्याचे पाहून पंढरपुरातील दोन बहाद्दरांनी नवा फंडा शोधला. अत्यावश्यक सेवेच्या पासची विक्री करण्याचा नवा धंदा सुरू केला आहे. सूरज मनोहर जाधव (वय ३०, महावीर नगर, पंढरपूर) हा त्याच्या घरी असलेल्या कलर प्रिंटरच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाचे बनावट पास तयार करत असे. त्या पासला प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे ग्राहक शोधण्याचे काम उमेश मोहन छत्रे (रा. महावीर नगर, पंढरपूर) करत होता. या दोघांकडून पास घेऊन शहरातील भाजी विक्रेता अंबादास रामकृष्ण सुरवसे हे आपला व्यवसाय करीत होते. यादरम्यान कोरोना नियंत्रण पथकातील नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक चिदानंद सर्वगोड, अतिक्रमण विभागाचे दत्तात्रय होटकर यांनी सुरवसे यांच्या पासची तपासणी केली. यावेळी त्यांना हा पास बनावट असल्याचे लक्षात आले. त्यांनी अधिक चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांच्या मदतीने पंढरपूर नगरपरिषदेच्या पथकाने छापा टाकल्यानंतर पास तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त केले. त्यामध्ये दहा बनावट पासही निदर्शनास आले. या दोघांनी आणखी किती लोकांना पास विकले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: The business of bogus passes of essential services in curfews; Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.