पर्यावरणोत्सव; सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिले तरच फुलपाखरू छान दिसेल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 12:28 PM2020-09-16T12:28:16+5:302020-09-16T12:31:18+5:30
बटरफ्लाय मंथ : रसायनांचा मर्यादित वापर, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनाची गरज
सोलापूर : आपल्या आजूबाजूला बागडणाºया फुलपाखरांना पाहून प्रत्येकाचे मन आनंदी होते. या आनंदी करणाºया फुलपाखरांची संख्या कमी होत असल्याचे संशोधन जागतिक स्तरावर झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. माळरान हे आपल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. त्याचे विभाजन झाल्याने फुलपाखरांच्या संख्येवर परिणाम होत आहे. रसायनांचा मर्यादित वापर आणि सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिले तरच एका मराठी गीताप्रमाणे फुलपाखरू छान किती दिसते, असे म्हणता येईल.
फुलपाखरे फुलांवरील मकरंद गोळा करण्याच्या उद्देशाने अनेक झाडांना भेटी देत असतात. त्या वेळी त्यांच्या पंखांना, शरीराला चिकटलेल्या परागकणांचा इतर फुलांतील बीजांडाशी मेळ होतो. यालाच परागीभवन म्हणतात. यात फुलपाखरांची महत्त्वाची भूमिका असते.
विविध प्रजातींची फुलपाखरे एखाद्या ठिकाणी असणे हे त्या ठिकाणच्या नैसर्गिकतेचे प्रतीक समजले जाते. फुलपाखरांच्या संख्येवर परिणाम झाल्यास परिसंस्थेवरही तो दिसून येतो. अंडी, त्यातून बाहेर येणाºया अळ्या, अळ्यांनी विणलेले कोष आणि त्यातून बाहेर येणारे फुलपाखरू असे त्यांचे जीवनचक्र असते. फुलपाखरांना वैविध्यपूर्ण समृद्ध वनस्पती संपदेचे परिमाण मानले जाते. गेल्या काही वर्षांत जंगलतोड, वाढते शहरीकरण, शेतीतील बदल, रसायनांचा वापर या कारणांमुळे फुलपाखरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नष्ट होत असलेले झुडपांचे प्रदेश, कीटकनाशकांचा वापर यामुळे फुलपाखरे संकटात आहेत. शेतकरी तसेच इतरांना फुलपाखरांचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे त्यांना नैसर्गिक अधिवास देण्यासाठी प्रयत्न करता येईल.
बटरफ्लाय गार्डनची संकल्पना
मागील काही वर्षांपासून बटरफ्लाय गार्डनची संकल्पना देशात रुजत आहे. सोलापुरात त्याचे प्रमाण कमी आहे. बटरफ्लाय गार्डन म्हणजे असा बगीचा जेथे अनेक प्रकारची फुलपाखरे एखाद्या छोट्या जागेत कमी वेळात बघता येतील. बटरफ्लाय गार्डन म्हणजेच फुलपाखरांचे उद्यान किंवा बाग. विजापूर रोड येथील स्मृती उद्यानात बटरफ्लाय गार्डन उभारण्यात आले आहे. तिथे विद्यार्थी कुतूहल म्हणून भेट देत असतात. फुलपाखरांच्या उद्यानात त्यांना बंदिस्त केलेले नसते, तर त्यांच्या सर्व नैसर्गिक गरजा पूर्ण होत असल्याने फुलपाखरेच येथे मोठ्या संख्येत जमतात. फुलपाखरे स्वत:हून या उद्यानात ये-जा करतात. मुक्तपणे बागडतात.
पारंपरिक शेती पद्धतीत बदलाचा फुलपाखरांच्या संख्येवर परिणाम
सोलापूर जिल्हा हा कमी पावसाचा म्हणून ओळखला जातो. पारंपरिकपणे येथे कमी पावसावर आधारित शेती केली जाते. पाण्याच्या योजना, विहिरी, बोअर यांमुळे शेतीच्या पद्धतीत बदल झाला. शेतीमध्ये घेण्यात येणारी पिके देखील बदलली. यामुळे फुलपाखरांच्या संख्येवर परिणाम झाला. कॉमन सिल्व्हर लाईन, ग्रास ब्लू, प्लेन क्युपीड, ग्रास ज्वेल, टायनी ग्रास ब्लू, लाईन ब्लू या माळरानावर दिसणाºया फुलपाखरांच्या संख्येची घट झाल्याचे निरीक्षणातून पुढे आले आहे.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना फुलपाखरांविषयी प्रत्यक्ष भेटीद्वारे माहिती द्यावी. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन जागृतीचे काम करायला हवे. शेतकºयांनाही रासायनिक शेतीचे दुष्परिणाम समजावल्यास फुलपाखरांची संख्या पुन्हा वाढू शकते.
- डॉ. राजशेखर हिप्परगी, प्राणिशास्त्र विभाग, वालचंद महाविद्यालय
ज्या ठिकाणी फुलपाखरु आढळतात तो भाग पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला समजला जातो. लॉकडाऊनदरम्यान वातावरणात प्रदूषण कमी असल्याने अनेक ठिकाणी फुलपाखरु पाहायला मिळाले. या प्रकारचे वातावरण त्यांच्या संख्यावाढ व अधिवासाला पूरक असते.
- सागर कांबळे,पर्यावरणप्रेमी
महाविद्यालयीन उपक्रम आणि स्मृती उद्यानातील बटरफ्लाय पार्क
बटरफ्लाय मंथ निमित्ताने विविध विज्ञान महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. विजापूर रोड परिसरातील स्मृती उद्यान येथे असलेल्या बटरफ्लाय गार्डन येथे अनेक विद्यार्थी भेटी देतात. तिथे नैसर्गिक पद्धतीने फुलपाखरांसाठी बाग तयार करण्यात आली आहे.