किमान आधारभूत योजनेतील शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन मका खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:24 AM2021-09-21T04:24:22+5:302021-09-21T04:24:22+5:30
अनगर : सध्याचा मक्याला भाव चांगला असून अगामी काळात बाजारभाव कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी नोंद केली ...
अनगर : सध्याचा मक्याला भाव चांगला असून अगामी काळात बाजारभाव कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. अशा शेतकऱ्यांची खरीप हंगाम २०२१-२२ किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेमध्ये मका खरेदी होणार आहे. त्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोद करून घेण्याचे आवाहन माजी आमदार राजन पाटील यांनी केले.
खरीप हंगाम २०२१-२२ किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य मका ऑनलाईन नोंदणी सुरू सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन पाटील बोलत होते.
मोहोळ तालुक्यात मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनगर येथे शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य मका खरेदी केली जाते. यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यात येते. मका खरेदीची किमान आधारभूत किंमत १,८७० रुपये आहे. यापूर्वी खरीप हंगामात मका २२५ शेतकऱ्यांची १० हजार ५८५ क्विंटल मका खरेदी करण्यात आली होती.
तसेच २०२१ रब्बी हंगामामध्ये ३३ शेतकऱ्यांची ७०१ क्विंटल मका खरेदी करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी नारायण गुंड, राम कदम, महादेव राऊत, भगीरथ गुंड, जावेद पठाण, शहाजी गुंड, रवींद्र पाचपुंड, शंकर गुंड आदी उपस्थित होते. ३० सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे.