सराफ बाजाराला खरेदीची चमक; सोलापुरात दिवाळीत दहा कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 04:24 PM2021-11-09T16:24:41+5:302021-11-09T16:25:26+5:30
लग्नसराईचीही खरेदी : पाटल्या, अंगठ्या, सोनसाखळ्यांना होती मागणी
सोलापूर : कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून खरेदीसाठी बाहेर न पडलेल्या ग्राहकांनी यंदाच्या दिवाळीत सोने व चांदीची तुफान खरेदी केली आहे. मागील पाच दिवस सलग सराफ गल्लीत ग्राहकांची झुंबड दिसली. ऐन दिवाळीत ग्राहकांची चकाकी लाभल्याने सराफ व्यावसायिक समाधानी दिसले. पाच दिवसात तब्बल दहा कोटींची उलाढाल सराफ गल्लीत झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे. विशेष म्हणजे ऐन दिवाळीत लग्नसराईची खरेदी होत आहे.
सोने आणि चांदीत गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढला आहे. त्यामुळे शुभमुहूर्ताचे निमित्त साधून अनेक जण सोने व चांदी खरेदी करतात. यंदाच्या दिवाळीत बहुतांश ग्राहकांनी सोने आणि चांदी खरेदीला पसंती दिली आहे. पाटल्या, सोनेरी बांगड्या, अंगठ्या, सोनसाखळ्या, नेकलेस, राणीहार, ब्रेसलेट, तोडे, मंगळसूत्र तसेच सोन्याची बिस्कीटे खरेदीला ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात चारशेहून अधिक सराफ दुकाने आहेत. शहरात सराफ गल्ली परिसर तसेच अशोक चौक परिसरात सर्वाधिक दुकाने आहेत. सलग पाच ते सहा दिवस या दोन्ही पेठांमध्ये ग्राहकांची तुफान गर्दी होती.
.......
असे आहेत दर
- सोने : ४८ हजार ६०० प्रति दहा ग्रॅम
- चांदी : ६६ हजार ५०० प्रति एक किलो
...................
तुळशी विवाहनंतर सलग सात महिने विवाहाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे सोने व चांदी खरेदीला सुरुवात झाली आहे. यंदाची दिवाळी चांगली गेली असून लग्नसराईची खरेदीदेखील चांगली होईल, अशी अपेक्षा आहे.
^ मिलिंद वेणेगुरकर] सराफ व्यावसायिक