सोलापूर शहरातील अतिक्रमणविरोधात मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:50 PM2018-05-03T16:50:29+5:302018-05-03T16:50:29+5:30
सोलापूर : शहरातील प्रमुख रस्त्याकडेला असलेल्या अतिक्रमणाविरुद्ध आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मोहीम सुरू केली आहे. आज पहिल्याच दिवशी सात रस्ता ते मोदी रेल्वे पूल मार्गावरील २५ टपºयांवर जेसीबी फिरविण्यात आला.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणधारकांनी आपले बस्तान बसविले आहे. यात अनेक व्यापाºयांनी फुटपाथ काबीज केले आहे. त्यामुळे पादचाºयांना सुरक्षित ये-जा करण्यासाठी फुटपाथचा उपयोग होत नाही. फुटपाथच्या पुढे जाऊन प्रमुख चौकात अनेक ठिकाणी फळविक्रेते, खाद्यपेय विक्रेत्यांनी बस्तान बसविले आहे. यामुळे रस्त्याच्या मध्यापर्यंत या अतिक्रमणाचा त्रास होतो. यामुळे सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी अनेकवेळा रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण विभागाला आदेश दिले; पण प्रभावी कारवाई होत नव्हती.
२ मेपासून आयुक्त डॉ. ढाकणे यांनी अतिक्रमण विरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात सात रस्ता चौकापासून करण्यात आली. शासकीय विश्रामधाम ते जातपडताळणी कार्यालयाच्या मार्गावर असलेल्या रस्त्यावरचे अतिक्रमण काढण्याची मोहीम बुधवारी सकाळी पार पडली. यावेळी आयुक्त डॉ. ढाकणे स्वत: हजर होते. अतिक्रमणविरोधी पथकाचा जेसीबी व डंपर चौकात दाखल झाले. कर्मचाºयांनी या ठिकाणी रस्त्यावर असलेल्या भेळ, चायनीज, आईस्क्रीम, वडापाव विक्रीच्या सुमारे २५ गाड्या जेसीबीने उचलून डंपरमध्ये घातल्या. या सर्व गाड्या जप्त करून भांडार विभागात जमा करण्यात आल्या आहेत. यापूर्वी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील पार्किंग मोकळे करण्याची मोहीम घेण्यात आली होती. आता रस्त्यावर थाटलेली दुकानदारी संपविण्यात येणार आहे.
बड्या दुकानांवर जेसीबी
च्शहरात महत्त्वाच्या ठिकाणी अनेकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. अशी दुकाने आता अतिक्रमण पथकाच्या रडारवर आहेत. नगरसेवक, पुढारी अशांची नावे सांगून अतिक्रमण पथकावर दादागिरी करणाºयांचीही आता दुकानदारी बंद होणार आहे. जुना पुणे नाका येथे तर चक्क रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्यावर शेड मारण्याचा प्रयत्न झाला आहे.
भाजी विक्रेत्यांवर फौजदारी...
च्रस्ते व पदपाथ व्यापाºयांसाठी नव्हे तर नागरिकांच्या वहिवाटीसाठी आहेत. विजापूर महामार्गावर तर भाजी विक्रेत्यांनी फुटपाथ काबीज केल्याचे दिसून येत आहे. १५ मेच्या आत भाजी विक्रेत्यांनी चैतन्य भाजी मंडईत जागा धरली पाहिजे; अन्यथा त्यानंतर जे भाजी विक्रेते रस्त्यावर आढळतील त्यांच्यावर फौजदारी करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.
शहरातील महत्त्वाचे चौक व वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. फुटपाथवरील अतिक्रमणाबाबत वारंवार सूचना देऊनही हटविले जात नाही. त्यामुळे आता ही मोहीम तीव्रपणे राबविण्यात येणार आहे.
- डॉ. अविनाश ढाकणे,
मनपा आयुक्त