‘भीमा’च्या १०७८ सभासदांचे सभासदत्व रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:19 AM2021-04-19T04:19:42+5:302021-04-19T04:19:42+5:30
कुरुल : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने सभासद केलेल्या १०७८ व्यक्तींच्या सभासदत्वाबाबत सोलापूर विभागाचे प्रादेशिक ...
कुरुल : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने सभासद केलेल्या १०७८ व्यक्तींच्या सभासदत्वाबाबत सोलापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या तक्रार अर्जाची सुनावणी पूर्ण झाली असून सोलापूरचे प्रादेशिक सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी त्या १०७८ व्यक्तींची नावे सभासद नमुना रजिस्टरमधून काढण्यात यावीत आणि ४५ सभासदांनी शेअरची रक्कम पूर्ण भरलेली नाही. त्या व्यक्ती मृत झाल्यामुळे त्यांची अनामत रक्कम परत करण्याचेही आदेश दिल्याची माहिती तक्रारदार भीमाचे माजी संचालक शिवाजीराव चव्हाण यांनी दिली.
शिवाजी चव्हाण यांनी ॲड. देशमुख यांच्या माध्यमातून आक्षेप घेतला होता. भीमा कारखान्याने एकूण १०७८ व्यक्तींना चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे सभासद करून घेतले आहे. कारखाना उपविधीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली नाही. हे सभासद कार्यक्षेत्रातील नाहीत व शेतकरी देखील नाहीत म्हणून त्या सभासदांना अपात्र घोषित करण्याची मागणी चव्हाण यांनी केली होती. १०७८ सभासदांपैकी ४५ सभासद मृत असल्याने उर्वरित १०३३ सभासदांच्यावतीने ॲड. योगेश शहा यांनी सुनावणीच्या वेळी म्हणणे सादर केले.
४५ व्यक्तीं सभासदांनी शेअरची रक्कम पूर्ण भरलेली नाही. नियमातील तरतुदीनुसार त्यांचे शेअर्स पोटी जमा असलेली अनामत रक्कम परत करण्यात यावी. तसेच त्या व्यक्ती मृत झाल्यामुळे उपविधीतील अटी व शर्तींची पूर्तता नसल्याने कलम २५ मधील तरतुदीनुसार त्या व्यक्तींची नावे कारखान्याच्या रजिस्टरमधून काढण्याचे देखील आदेश प्रादेशिक सह संचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी दिले आहेत.