मतदानापूर्वीच उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:25 AM2021-01-16T04:25:36+5:302021-01-16T04:25:36+5:30
बिराजदार हे शेतकरी असून त्यांना शेतकरी ग्रामविकास पॅनलप्रमुखांनी बळजबरीने उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उभे केले होते, अशी चर्चा ग्रामस्थांमधून ...
बिराजदार हे शेतकरी असून त्यांना शेतकरी ग्रामविकास पॅनलप्रमुखांनी बळजबरीने उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उभे केले होते, अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे. ते प्रभाग-३ मधून सर्वसाधारण पुरुष जागेमधून निवडणूक लढवत होते. मागील आठ दिवसांपासून निवडणुकीच्या कारणावरून सतत तणावात होते. १४ रोजी गुरुवारी दिवसभर प्रचार करून संख्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागल्याने जवळील वागदरी गावातील एका दवाखान्यात उपचार घेऊन घरी गेले होते. काही काळ बरे वाटत होते. रात्री पुन्हा ९ वाजण्याच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना थेट सोलापूर येथे एका सहकार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री ११ वाजता पुन्हा हृदयविकाराचा झटका येऊन उपचारादरम्यान निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गावच्या स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहीण, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
त्या प्रभागाची निवडणूक पुढे ढकलली
खैराट ग्रामपंचायत ही एकूण सात सदस्यसंख्येची आहे. सायबणा बिराजदार प्रभाग-३ सर्वसाधारण पुरुष जागेमधून निवडणूक लढवत होते. १५ रोजी मतदानासाठी मतदान यंत्रे, मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या प्रभागाची निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्या जागेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी दिली.
फोटो
१५सायबणा बिराजदार