संचारबंदीतही उमेदवारांचा गाठीभेटींवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:26+5:302021-03-28T04:21:26+5:30
मात्र, राहिलेला प्रत्येक दिवस महत्त्वाचा मानत महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार भगीरथ भालके यांनी दिवसभर आपल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, पदाधिकाऱ्यांची नाराजी ...
मात्र, राहिलेला प्रत्येक दिवस महत्त्वाचा मानत महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार भगीरथ भालके यांनी दिवसभर आपल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यात वेळ घालविला. त्यांचे संपूर्ण कुटुंबीय मतदारसंघात ठिकठिकाणी प्रत्यक्ष गाठीभेटीद्वारे मतदारांच्या संपर्कात आहेत. शिवाय स्व. भारत भालके यांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीतील महत्त्वाच्या सूचना ऐकून घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भगीरथ भालके तत्पर दिसत होते.
शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार शैला गोडसे यांनी सोशल मीडिया, दूरध्वनी व घरोघरी भेटी घेत आपला संपर्क कायम ठेवला आहे. आपल्याकडे साखर कारखानदारांएवढी प्रचाराची फळी उपलब्ध नसल्याने त्या स्वत: प्रत्यक्ष गाठीभेटी, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे काम करताना दिसत आहेत. भाजपकडून समाधान आवताडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत मते जाणून घेतली आहेत. भविष्यात कोणाला भेटावे लागले, कोणाची कशी समजूत काढावी लागेल, याची ते चाचपणी करत आहेत. येणाऱ्या काळात कोणते नियोजन करावे लागेल, याविषयी मते घेऊन कार्यकर्ते कामाला लावताना दिसत होते. स्वाभिमानीकडून सचिन शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा स्वत: गावभेटी दौरा सुरू असून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदारांच्या भावना जाणून घेताना दिसत आहेत.
कॉर्नर सभा, मेळाव्यांवर मर्यादा
निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी, भाजप, अपक्ष उमेदवारांकडून ठिकठिकाणी कॉर्नर सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका, सार्वजनिक मेळावे, गावागावात पदयात्रा काढत पोटनिवडणूक वातावरण निर्मितीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. मात्र, अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या संचारबंदीच्या घोषणेमुळे कॉर्नर सभा, मेळाव्यांना मर्यादा आल्या आहेत. तरीही नेते, कार्यकर्ते जिवाचे रान करून मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत.