उमेदवारांचा सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:10+5:302021-01-08T05:10:10+5:30
गेल्या एक महिन्यापासून सोशल मीडियाचा हा यज्ञ धगधगता ठेवण्यासाठी कार्यकर्ते रात्रंदिवस सोशल मीडियावर अपडेट आहेत. दरम्यान, सांगोला तालुक्यात ५६ ...
गेल्या एक महिन्यापासून सोशल मीडियाचा हा यज्ञ धगधगता ठेवण्यासाठी कार्यकर्ते रात्रंदिवस सोशल मीडियावर अपडेट आहेत.
दरम्यान, सांगोला तालुक्यात ५६ ग्रामपंचायतींच्या ६०४ जागांसाठी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच मंगळवारी पॅनल प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उमेदवारांसह ग्रामदैवतांना श्रीफळ वाढवून प्रचाराचा धूमधडाक्यात शुभारंभ केला.
कार्यकर्त्यांनी तत्काळ प्रचाराचे फोटो अपडेट माहितीसह व्हाॅट्सॲप, फेसबुकवर माध्यमातून सोशल मीडियावर पोस्ट टाकून प्रचार सुरू केला.
सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यावर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले. प्रचाराचा शुभारंभ करताना कोरोनाचे नियम पायदळी तुडवून उत्साही कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. गावगाड्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागल्याने सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे.
पूर्वी प्रचाराची खूप वेगळी पद्धत होती. उमेदवारांचा प्रभाग, नाव, चिन्ह भिंतीवर काढले जायचे. कालांतराने प्रचार पद्धतीत बदल होत गेल्यामुळे आता प्रचारात थेट सोशल मीडियाचा वापर होऊ लागला आहे. हल्ली निवडणुकीत एखाद्याला ट्रोल करायचे असेल किंवा एखाद्याची कुरापत काढायची असेल तर सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
सर्वच राजकीय पक्षांचा सोशल मीडियावर भर
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे क्षणाक्षणाला सोशल वॉर पहायला मिळणार आहे. यात कोण बाजी मारणार? हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.