गतिरोधकवर दुचाकी आदळून कॅन्टीन चालकाचा मृत्यू
By दिपक दुपारगुडे | Published: May 25, 2023 06:59 PM2023-05-25T18:59:50+5:302023-05-25T19:00:05+5:30
उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
सोलापूर : अक्कलकोट रेल्वेस्टेशन रोडवरील डिग्गेवाडी तांडा समोर असलेल्या गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये चहा कॅन्टीन चालक चिचलप्पा शरणप्पा कुंभार ( वय ३८, रा. पिरजादे प्लाट, बासलेगाव रस्ता) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात रविवार, दि.२१ रोजी दुपारी २ वाजता घडला. तर, चंद्रकांत शांतप्पा कुंभार ( वय ४०, रा. महादेवनगर) असे अपघातामध्ये जखमी विवाहित तरुणाचे नाव आहे.
रविवारी दुपारी दोन वाजता कुंभार हे मोटारसायकल ( एमएच१३ इडी ७०७८) वरून अक्कलकोटकडे येत असताना डिग्गेवाडी येथे गतिरोधकवर दुचाकी आदळून अपघात झाला. या अपघातात चिचलप्पा कुंभार यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी अक्कलकोट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिचलप्पा कुंभार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,आई, वडील व एक भाऊ आहेत.
अपघातस्थळा जवळून विलास राठोड हे नातेवाइकांचे लग्न उरकून घरी अक्कलकोटकडे येत असताना रस्त्यावर जखमी बेशुद्धावस्थेत दोन तरुण पडल्याचे दिसले. यावेळी विलास राठोड, विजय राठोड, सागर चव्हाण, भालचंद्र राठोड, प्रवीण राठोड, अनिल राठोड यांनी राठोड यांच्या कारमधून जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांना प्राथमिक उपचार करून सोलापूर येथे हलवण्यात आले होते.