पंढरपूरच्या आषाढी वारीत ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रणास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 03:00 PM2018-06-28T15:00:08+5:302018-06-28T15:00:57+5:30
सोलापूर : पंढरपूरला येणारे पालखी सोहळे किंवा आषाढी वारीतील गर्दीचे ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई जाहीर केली आहे.
पंढरपुरात आषाढीवारीचा सोहळा १३ ते २८ जुलै या कालावधीत भरणार आहे. यासाठी पंढरपुरात सुमारे १० ते १२ लाख वारकरी भाविक दाखल होतात. पालखी मार्ग व पंढरपुरात आषाढी वारी सोहळ्याची होणारी गर्दी लक्षात घेऊन अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये वरील कालावधीत पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर आणि पंढरपूर आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घातली आहे.श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपानदेव महाराज, श्री संत नामदेव महाराज, श्री संत एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई व संत श्री गजानन महाराज या मानाच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत.
विशेषत: वेगवेगळ्या नदी घाटावर सोलापूर जिल्ह्यातून येणाºया सर्व पालखी मार्गांवर बरेच टी.व्ही. चॅनल्स, खासगी व्यक्ती, संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते. ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण होऊन त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय गोंधळ उडून चेंगराचेंगरीसारखा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. हे आदेश सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) व सर्व नगरपालिका हद्दीत लागू करण्यात आले असल्याचे अपर जिल्हा दंडाधिकारी तेली यांनी आदेशात नमूद केले आहे.
मनाई आदेश लागू
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र शांता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) अन्वये (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) २६ जून २०१८ पासून पुढील १५ दिवस आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
ज्या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी पूर्वपरवानगी दिली आहे, अशा यात्रास्थळ व तत्सम प्रकरणासाठी हा आदेश लागू राहणार नाही, असे अपर जिल्हा दंडाधिकारी तेली यांनी आदेशात नमूद केले आहे.